धर्मांध व जातीवादी भाजपाला पराभूत करणे हेच काँग्रेस पक्षाचे लक्ष्य
लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी २ व ३ जून रोजी मतदार संघनिहाय बैठकीचे आयोजन
मुंबई दि २६(प्रतिनिधी)- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने महत्वाची बैठक बोलावली आहे. टिळक भवन या पक्ष कार्यालयात २ व ३ जून रोजी लोकसभा मतदारसंघ निहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला राज्यातील सर्व प्रमुख नेते व जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत प्रत्येक मतदारसंघाचा सर्वबाजूने विचार केला जाणार आहे. धर्मांध व जातीवादी भारतीय जनता पक्षाचा पराभव करणे हेच काँग्रेसचे लक्ष्य असून आगामी लोकसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढण्याचा पक्षाचा निर्धार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या बैठकीला विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान, बसवराज पाटील, चंद्रकांत हंडोरे, आ. प्रणिती शिंदे, आ. कुणाल पाटील, महाविकास आघाडी सरकार मधील काँग्रेस पक्षाचे सर्व माजी मंत्री, विधान परिषद गटनेते सतेज पाटील तसेच प्रदेश निवडणूक समन्वय समितीचे सदस्य उपस्थित असतील. तसेच लोकसभा मतदार संघातील प्रमुख नेते, जिल्हा प्रभारी, आजी माजी खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, २०१९ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार, जिल्ह्यातील आघाडी संघटना व विभागाचे अध्यक्ष उपस्थित राहतील. भारतीय जनता पक्षाचे सरकार मागील ९ वर्षांपासून देशाला अधोगतीकडे घेऊन जात आहे. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षाच्या सरकारने भारताला जगात एक महाशक्ती म्हणून उभे केले पण नरेंद्र मोदी सरकारने केवळ ९ वर्षांत देशातील सर्व वैभव विकण्याचा सपाटा लावला आहे. देश विकूण देश चालवला जात आहे. जाती-धर्मांमध्ये विष कालवून राजकीय पोळी भाजण्याचे पाप केले जात आहे.
नुकत्याच झालेल्या हिमाचल प्रदेश व कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जनतेने भरघोस मतदान करत विजयी केले आहे. या विजयाने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण झाली असून महाराष्ट्रातही भारतीय जनता पक्षाला धूळ चारू असा निर्धार काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला आहे.