‘आम्हाला भाजपकडून सापत्न वागणूक मिळत आहे’
शिंदे गटातील खासदारांची एकनाथ शिंदेकडे तक्रार, भाजप शिंदे गटात मतभेद, युती तुटणार?
मुंबई दि २६(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी आम्हाला सापत्न वागणूक देत आहे त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करताना विधान केले होते. पण भाजपासोबत जाऊनही यात फरक पडला नसल्याचे दिसत आहे. कारण शिवसेनेच्या शिंदे गटाचे वरिष्ठ नेते आणि खासदार गजाजन किर्तीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबच्या बैठकीत भाजपची तक्रार केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा युतीत वाद असल्याची चर्चा रंगली आहे.

अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना खासदारांची बैठक झाली. या बैठकीत खासदारांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी किर्तीकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत आम्ही शिवसेनेत आलो आहोत. आम्ही आता एनडीएचे घटक आहोत. त्यामुळे आमची देखील कामे झाली पाहिजेत. मात्र घटक पक्षाला सापत्न वागणूक मिळत असल्याचे गजाजन किर्तीकर यांनी सांगितले.यावेळी आम्हाला अधिक निधी आणि समान वागणूक मिळाली पाहिजे, अशी मागणी गजानन किर्तीकर यांनी केली. त्यामुळे ही नाराजी शिंदे कशी दुर करतात हे पहावे लागणार आहे. कारण याआधीही भाजपाकडून अनेक वेळा शिंदे गटाला दुजाभाव करत डावलण्यात आले आहे. याआधी आमदार संजय गायकवाड यांनी भाजपा आम्हाला विश्वासात घेत नसल्याचा आरोप करत बाजार विधान परिषदेतील पराभव हा युतीचा नसून फक्त भाजपाचा असल्याचा दावा केला होता. त्यामुळे ही नाराजी संपणार की वाढणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
गजानन किर्तीकर यांनी यावेळी ठाकरेंवर देखील टिका केली आहे. आम्ही उद्धव ठाकरेंना खासदारांच्या बैठकीत पक्ष दुभंगतोय, तोडगा काढा, जुळवून घ्या असे सांगत होतो पण त्यांनी ऐकले नाही. त्यामुळे हे दोन्ही एकत्रित येतील हा विषय संपला आहे असे गजानन किर्तीकर यांनी सांगितले आहे.