काँग्रेसची २ व ३ जून रोजी लोकसभा मतदारसंघनिहाय बैठक
प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या अध्यक्षतेखाली टिळक भवनमध्ये बैठक
मुंबई दि १(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने टिळक भवन या पक्ष कार्यालयात २ व ३ जून रोजी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत राज्यातील लोकसभा मतदारांचा आढावा घेतला जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत असून बैठकीला राज्यातील प्रमुख नेते व सर्व जिल्हा अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.
शुक्रवार दिनांक २ जून रोजी सकाळी १०.३० वाजता बैठकीला सुरुवात होत असून पहिल्या दिवशी सिंधुदुर्ग रत्नागिरी, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, रावेर, अहमदनगर, शिर्डी, नाशिक, दिंडोरी, लातूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ वाशिम, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर, भंडारा गोदिया, वर्धा, नागपूर, रामटेक व पालघर या मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. शनिवार दिनांक ३ जून रोजी पुणे, सांगली, कोल्हापूर, हातकणंगले, सातारा, सोलापूर, माढा, बारामती, शिरुर, मावळ, रायगड, नांदेड, हिंगोली, औरंगाबाद, जालना, परभणी, उस्मानाबाद, बीड, ठाणे, भिवंडी व कल्याण या मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या बैठकीला विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान, बसवराज पाटील, चंद्रकांत हंडोरे, आ. प्रणिती शिंदे, आ. कुणाल पाटील, महाविकास आघाडी सरकार मधील काँग्रेस पक्षाचे सर्व माजी मंत्री, विधान परिषद गटनेते सतेज पाटील तसेच प्रदेश निवडणूक समन्वय समितीचे सदस्य उपस्थित असतील.
तसेच लोकसभा मतदार संघातील प्रमुख नेते, जिल्हा प्रभारी, आजी माजी खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, २०१९ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार, जिल्ह्यातील आघाडी संघटना व विभागाचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.