यशवंतराव चव्हाण सेंटरचे कर्तृत्ववान महिलांना देण्यात येणारे ‘यशस्विनी सन्मान पुरस्कार जाहीर
बालगंधर्वमध्ये येत्या २२ जून रोजी वितरण सोहळा, शरद पवारांच्या हस्ते वितरण सोहळा
पुणे, दि. १० (प्रतिनिधी) – यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने देण्यात येणारे ‘यशस्विनी सन्मान’ पुरस्कार जाहीर करण्यात आले असून येत्या २२ जून रोजी पुण्यात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहेत. राज्यातील सामाजिक, साहित्य, कृषी, पत्रकारिता, उद्योजकता, क्रीडा प्रशिक्षण क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सहा जणींची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या महिला धोरणाला २२ जून रोजी २९ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या दिवसाचे औचित्य साधून या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली असून ज्येष्ठ कवी, लेखक जावेद अख्तर आणि प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. चव्हाण सेंटरचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. विविध विषयांवर कथा, कादंबरी यांसह चौफेर लिखाण करणाऱ्या डॉ. सुनिता बोर्डे (सांगली)यांना ‘यशस्विनी साहित्य सन्मान’, संपूर्ण सेंद्रिय खतांचा उपयोग करून शेती पिकवणाऱ्या भारती नागेश स्वामी (कराड, सातारा) यांना ‘यशस्विनी कृषी सन्मान’, आपल्या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लक्ष्मी नारायणन (पुणे) यांना ‘यशस्विनी सामाजिक सन्मान’, विविध माध्यमातून पत्रकारितेची छाप समाजमनावर उमटवणाऱ्या शर्मिला प्रभाकर कलगुटकर (ठाणे) यांना ‘यशस्विनी पत्रकारिता सन्मान’, उद्योजकता क्षेत्रात काम करणाऱ्या राजश्री पाटील (नांदेड) यांना ‘यशस्विनी उद्योजकता सन्मान’, कबड्डी खेळाडू व आता प्रशिक्षक म्हणून काम करणाऱ्या शैलजा जैनेंद्रकुमार जैन (नाशिक) यांना ‘यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान’ जाहीर करण्यात आला आहे.
पुरस्काराचे हे दुसरे वर्ष असून या सहाही क्षेत्रात अत्यंत तळमळीने काम करत योगदान देणाऱ्या या सहाजणींना पुरस्कार देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. मागच्या वर्षी या पुरस्काराची सुरुवात केली असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाने संपूर्ण देशात प्रथमच सन १९९४ साली महिला धोरण जाहीर केले. या महिला धोरणाला यंदा २९ वर्ष पूर्ण होत आहेत. ते जाहीर करण्याची तारीख २२ जून हीच होती. ते औचित्य साधून या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, असे त्या म्हणाल्या. राज्यभरातील सामाजिक, साहित्य, कृषी, पत्रकारिता, उद्योजकता आणि क्रीडा प्रशिक्षण या क्षेत्रांतून अनेक महिलांच्या कार्याचा आढावा घेतल्यानंतर या सहा ‘यशस्विनी’ मिळाल्या असून यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने आपण त्यांचा सन्मान करत आहोत. असे त्यांनी नमूद केले.