महाराष्ट्रात अबकी बार देवेंद्र फडणवीस की सरकार?
नव्या सर्व्हेची धक्कादायक आकडेवारी समोर, महाविकास आघाडीला एवढ्याच जागा, शिंदेचेही पानिपत?
महाराष्ट्र दि २०(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात सध्या सर्वच पक्षाकडून लोकसभेची तयारी केली जात आहे. आघाडी आणि युतीमध्ये सध्या जागावाटपाच्या वाटाघाटी सुरु आहेत. सर्वच पक्ष आपलीच सत्ता येणार असा दावा करत आहेत. पण आता ‘न्यूज एरिना इंडिया’ या संस्थेने केलेल्या सर्व्हेमध्ये धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. आजघडीला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्यास कोणाची सत्ता येईल याचा अहवाल समोर आला आहे.
‘न्यूज एरिना इंडिया’च्या पाहणीनुसार, महाराष्ट्रात आज विधानसभेची निवडणूक झाली, तर सत्ताधारी भाजपला सर्वाधिक १२३ ते १२९ जागा मिळतील. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला अवघ्या २५ जागा मिळतील. असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या गटाला अवघ्या १७ ते १९ जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला ५५ तर काँग्रेसला ५० ते ५३ जागा मिळणे अपेक्षित आहे. तर इतर पक्ष व अपक्षांना १२ जागा मिळण्याचा अंदाज आहे. एकंदरीत शिवसेना फुटीचा तोटा ठाकरे आणि शिंदेना बसणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि भाजपाला मात्र फायदा होताना दिसत आहे. महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढवली तर त्याचा सर्वाधिक फायदा काँग्रेसला होणार आहे. तसेच आघाडी झाली नाही तर काँग्रेसला केवळ २५ जागा मिळणार असल्याचा अंदाज संस्थेने वर्तवला आहे. दरम्यान राज्यातील ३५ टक्के जनतेची मुख्यमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे. न्यूज एरिना ही संस्था इंटरनेटवर पाहणी करून अचूक अंदाज व्यक्त करण्यासाठी ओळखली जाते. यांचा कर्नाटक विधानसभा निवडणुकीसंबंधी व्यक्त केलेला अंदाज काहीसा बरोबर आला होता.
पश्चिम महाराष्ट्राचा विचार केल्यास ५४ जागांपैकी राष्ट्रवादीला २३ जागा तर भाजपला २२-२३ जागा मिळतील. काँग्रेसला केवळ १० जागा तर शिवसेनेला एका जागेवर समाधान मानावं लागणार आहे. एकंदरीत महाराष्ट्रात चुरशीच्या लढती पहायला मिळणार आहेत.