एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद लवकरच जाणार?
शिंदेची भरपाई करण्यासाठीच भाजपाकडून अजित पवारांना मंत्रीपद, एकनाथ शिंदे अपात्र ठरण्याची शक्यता
मुंबई दि २(प्रतिनिधी)- अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा फुटीर गट राज्य सरकारमध्ये सहभागी होताच संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या भवितव्याबाबत मोठा दावा केला आहे. राज्याला लवकरच एक नवीन मुख्यमंत्री भेटणार आहेत असा दावाही राऊत यांनी केला आहे. यावेळी राऊत यांनी एकनाथ शिंदेवर जोरदार टिका केली आहे.
अजित पवार यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले “महाराष्ट्राच्या राजकारणात आज जे काही घडलंय तो राजकीय भूकंप वगैरे नाही. पडद्याआड ही सगळी प्रक्रिया सुरू होती. आम्हालाही याची माहिती होती. एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र होणार असल्यानंच अजित पवारांची मदत भाजपला घ्यावी लागलीय, अजित पवार यांच्यासोबत काही लोकांनी शपथ घेतली हे पाहिलं. याचा अर्थ स्पष्ट आहे की जे सध्याचं सरकार आहे ते अस्थिर आहे. शिंदे-फडणवीस सरकारला १६५ आमदारांचा पाठिंबा असल्याचा त्यांचा दावा होता. असं असतानाही भाजपला अजित पवार आणि ३०-३५ आमदारांची गरज का लागते. शिंदे-फडणवीस सरकारच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयानं निवाडा दिलेला आहे. त्यानुसार एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार अपात्र ठरणार आहेत. हे सरकार बेकायदेशीर आहे. शिंदेंचं मुख्यमंत्रीपद जाण्याची चिन्हं आहेत. एक इंजिन बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळं भाजपनं हे दुसरं इंजिन जोडलंय” असे संजय राऊत म्हणाले आहेत. तर राज ठाकरे यांनीही “तसंही महाराष्ट्र भाजपला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्त्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला. अशा आशयाचे ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे अजित पवार यांचे सरकारमध्ये सामील होणे शिंदे गटासाठी धोक्याची सुचना असल्याचे बोलले जात आहे.
शिंदे गटाने शिवसेनेत बंड करताना अजित पवार निधी वाटपात अन्याय करत असल्याचे कारण देत त्यामुळे आपण बंड करत आहोत असे सांगितले होते. त्याचबरोबर संजय शिरसाट यांनी फक्त अजित पवार चालतील पण राष्ट्रवादीतील कोणताही नेता जर सोबत येणार असेल तर आम्ही सत्तेत राहणार नाही असा दावा केला होता. त्यामुळे एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.