आणि संतप्त महिलेने चक्क आमदाराच्या कानाखाली लगावली
आमदाराला मारल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, आमदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी
हरियाणा दि १३(प्रतिनिधी)- राजकारणी फक्त निवडणूकीच्या काळात जनतेच्या दरबारात जातात. नंतर मात्र ते जनतेला विचारत सुद्धा नाहीत. असे आपण सर्वसाधारणपणे बोलत असतो किंवा एैकत असतो. पण हरियाणात मात्र एका महिलेने आपल्या आमदाराला पाच वर्षात आज आठवण आली का? असे विचारत चक्क कानाखाली लगावली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
उत्तर भारतात सध्या पुराने थैमान घातले आहे. त्यामुळे अनेकांना जीव गमावावा लागला आहे. तर अनेकांचा संसार उघड्यावर आला आहे. हरियाणातील कैथल जिल्ह्यात जननायक जनता पक्षाचे आमदार ईश्वर सिंह हे पुराची पाहणी करत होते. यावेळी हा प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार घग्गर नदीचा बंधारा फुटल्यानंतर गावात आलेल्या पुराच्या पाण्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार ईश्वर सिंह हे चीका परिसरातील भाटिया गावात पोहोचले होते. पुर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार उशीरा आल्याने नागरिक प्रचंड संतापले होते. त्यामुळे नागरिकांनी आमदारांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. तुम्ही पाच वर्षे आम्हाला विचारलं नाही मग आता कशाला आला आहात? असा सवाल ईश्वर सिंह यांना विचारला. यावेळी लोकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरु केली. ईश्वर सिंह यांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला, पण ते अपयशी ठरले. त्याचवेळी संतप्त झालेल्या एका वृद्ध महिलेने गर्दीत ईश्वर सिंह यांना कानाखाली लगावली. मग मात्र सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप करत आमदारांना सुरक्षितपणे गावातून बाहेर काढले. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
महिलेवर कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई करायची नाही, मी त्या महिलेला माफ केलं आहे, असे म्हणत आमदार ईश्वर सिंह यांनी आपली भुमिका स्पष्ट केली आहे. हरयाणात विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने त्यांनी ही भूमिका घेतली असल्याची चर्चा आहे. हरियाणात पावसाने आत्तापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे.