
कर्जबाजारी झाल्याने पती पत्नीची चिमुकल्यांसह आत्महत्या
सेल्फी घेत संपवले जीवन, सल्फास घालून मुलांना पाजले, सुसाईड नोटमधून मोठा खुलासा
भोपाळ दि १३(प्रतिनिधी)- मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये गुरुवारी एका जोडप्याने आपल्या दोन मुलांना विष पाजून ठार मारले आणि नंतर गळफास लावून आत्महत्या केली आहे. आॅनलाईन लोनच्या तणावातून त्यानी हे धक्कादायक पाऊल उचलले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
भूपेंद्र विश्वकर्मा, भूपेंद्रने पत्नी रितू, मुले ऋतुराज आणि ऋषिराज अशी आत्महत्या केलेल्याची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार भुपेंद्र कोलंबिया येथील एका कंपनीत ऑनलाइन नोकरी करायचे. भूपेंद्र यांच्यावर कामाचा ताण आणि कर्ज होते. त्यामुळे कंपनीने त्यांचा लॅपटाॅप हॅक करुन त्यातील त्यांचा एक व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने एडिट केला.तसेच पैसे न दिल्यास तो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे भुपेंद्र कायम तणावात असायचे. घटनेच्या दिवशी भुपेंद्र यांनी आपण आत्महत्या करणार असल्याचा मेसेज केला. त्यानंतर त्यांनी दोन्ही मुले आणि पत्नीसोबत रात्री उशिरा सेल्फी काढला. आणि मुलांना मारण्यासाठी कोल्ड्रिंकमध्ये सल्फास मिसळून दोघांनाही प्यायला दिले. यानंतर भूपेंद्र आणि त्याची पत्नी रितू यांनी गळफास घेत आत्महत्या केली. यावेळी पोलीसांनी एक सुसाईड नोट आढळून आली आहे. यामध्ये त्यांनी कर्जासाठी होत असलेल्या त्रासाची माहिती दिली. तसेच या प्रकारामुळं मला ना कुणाच्या नजरेला नजर भिडवता येत असे. म्हणूनच मी माझी पत्नी आणि मुले ऋषू आणि किशू यांना या सर्वांना सोबत घेऊन जात आहे. मी पुन्हा एकदा माफी मागतो. कृपया माझ्या कुटुंबाला क्षमा करा. मी मजबूर आहे आम्ही निघून गेल्यावर कदाचित सर्व काही ठीक होईल. आम्ही गेल्यानंतर कुटुंबीयांना कर्जासाठी त्रास देऊ नये. तसेच कोणत्याही नातेवाईक किंवा सहकारी कर्मचाऱ्याला त्रास देऊ नये, असं या सुसाईडनोटमध्ये लिहिले आहे.
दरम्यान पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर ते घरात गेले असता नवरा-बायको एका खोलीत लटकलेल्या अवस्थेत सापडले. त्यांची आठ आणि तीन वर्षांची मुले घराच्या दुसर्या भागात मृतावस्थेत आढळून आली. भुपेंद्र वर्षभरापासून संबंधित कंपनीत काम करत होते. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.