रवींद्र महाजनींच्या मृत्यूने या अभिनेत्रीला बसला मोठा धक्का
आठवण सांगताना झाली भावूक म्हणाली, त्यांना कधीही भेटले तरी हँडसम हंक....
मुंबई दि १५(प्रतिनिधी)- चित्रपटसृष्टीतील देखणे हिरो अशी ओळख असलेले अभिनेते रवींद्र महाजनी यांचे आज निधन झाले. घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने हा खुलासा झाला. पोलीसांनी त्यांचा मृत्यू दोन तीन दिवसापुर्वी झाला असावा असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पण अभिनेत्री रूपाली भोसले यांनी भावनिक पोस्ट लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अभिनेत्री रुपालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन रवींद्र महाजनी यांच्याबरोबरचे जीममधील काही फोटो शेअर करत भावुक पोस्ट लिहिली आहे. “मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांनी भावपूर्ण श्रद्धांजली. आम्ही एका जीममध्ये वर्कआऊट करायचो. त्यांच्या एका चित्रपटात काम करण्याची संधीही मला मिळाली होती. त्यांची स्टाइल त्यांनी कायम तशीच ठेवली होती. मी त्यांना कधीही भेटले तरी हँडसम हंक असं म्हणायचे, आईचा आवडता हिरो मुंबईचा फौजदार. हा त्यांचा सिनेमा.. सिनेमाच्या बॅनरच प्रिंट माझ्या वडिलांनी केलं होतं. त्यावेळी hand पेंटिंग होते. आणि पप्पा प्रिंटिंग लाईन मध्ये होते. कॉम्प्युटर येईपर्यंत पप्पा स्वतः डिझाईन वैगरे करायचे. सो त्यावेळी त्यांनी ह्या सिनेमासाठी काम केलं होतं. पण कधी त्यांची भेट काकांसोबत झाली नाही. पण आपण म्हणतो आयुष्य आयुष्य हे एक सर्कल आहे तसंच झालं. आणि मला त्यांच्यासोबत काम करायला मिळाले. असे रुपालीने म्हटले आहे. दरम्यान अनेकांनी महाजनी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
महाजनी हे गेल्या काही दिवसांपासून आंबी येथील फ्लॅटमध्ये एकटेच राहत होते. शुक्रवारी त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी आल्याने नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. फ्लॅटचा दरवाजा तोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी महाजनींचा मृतदेह आढळून आला.