…तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार?
मराठा आरक्षणावरुन सरकारची कोंडी, मराठा ओबीसी वादाची चिन्हे शिंदेची विकेट घेणार? मोठी खेळी?
मुंबई दि ६(प्रतिनिधी)- मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. पण आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सोडणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. त्यातच लाठीहल्ला प्रकरणामुळे शिंदे सरकार बॅक फुटवर आले आहे. त्यातच मराठा समाजाला कुणबी जातीचा दाखला देण्याचीही मागणी केली जात आहे. त्यामुळे ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यात अभुतपर्व तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. असे असताना एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी २९ ऑगस्टपासून जालना येथे जरांगे-पाटील यांचे आंदोलन सुरु आहे. पण पोलीसांनी आंदोलन स्थळी लाठीहल्ला केल्यामुळे राज्यभरात सरकारविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे खुद्द मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांना पत्रकार परिषद घेत लाठीहल्ला प्रकरणी माफी मागावी लागली. त्यानंतर सरकारचे एक शिष्टमंडळ जरांगे पाटील यांची भेट घेत चर्चा करत आहे. त्यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी राज्याच्या शिष्टमंडळाकडून त्यांची मनधरणी सुरु आहे. शिष्टमंडळात मंत्री गिरीष महाजन, मंत्री संदीपान भुमरे, मंत्री अर्जुन खोपकर आणि मंत्री अतुल सावे यांचा समावेश आहे. यावेळी बेमुदत उपोषणावर ठाम राहात, राज्य सरकारने आणखी चार दिवसांचा कालावधी घ्यावा; पण मराठा आरक्षणावर ठोस तोडगा काढावा, अशी मागणी जरांगे- पाटील यांनी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाकडे केली. त्यामुळे सरकारपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. दुसरीकडे मराठा समाजाला कुणबी दाखला देण्याचीही मागणी केली जात आहे. त्यामुळे राज्यातील ओबीसी आरक्षणात वाटेकरी वाढतील अशी भीती व्यक्त केली जात आहे. या विरोधात मागील काही दिवसांपासून ओबीसी नेत्यांची नाराजी व्यक्त करणारी विधाने येत आहेत. त्यामुळे सरकारची मोठी अडचण झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी मीही मराठाच असे आवाहन करत समाजाला शांत करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. त्यामुळे सरकारविरोधात असंतोष निर्माण होत आहे. मराठा समाजाबरोबर ओबीसी समाजही आक्रमक झाला आहे. हे सर्व सुरु असताना कायदेतज्ज्ञ आसीम सरोदे यांनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे. एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेण्यासाठी हे सुरु आहे का? असा सवाल असीम सरोदे यांना उपस्थित केला आहे. त्यांनी x वर आपले मत मांडले आहे. ‘एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घेण्यासाठी आणि मागण्यासाठी पार्श्वभूमी व कारणे तयार केली जात आहेत का? कारण आरक्षण हा विषय तर राज्य सरकार सोडवू शकत नाही. त्यासाठी केंद्र सरकारनेच संविधानिक सुधारणा केली पाहिजे. मराठा आरक्षण हा राजकीय विषय झालाय हे दुर्दैव’, असं मत ॲड. असीम सरोदे यांनी मांडले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे जाणार अशी चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे राजीनामा देणार की सर्व चर्चांवर मात करत आपली खुर्ची टिकवणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे. पण सरकार मराठा ओबीसी संघर्ष टाळत मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काय पावले उचलणार हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे.
विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी काही दिवसापुर्वीच सप्टेंबर महिन्यात राज्याला नवीन मुख्यमंत्री मिळणार असा दावा केला होता. त्यातच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाद जगजाहीर झाला आहे. शिवाय भाजपानेही सोयिस्करपणे आरक्षण मुद्दा एकनाथ शिंदे यांच्याकडे टोलावला आहे. त्यामुळे आगामी काळात काय घडामोडी घडणार, त्यातून काय नवीन समीकरणे होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सरकारची मोठी कोंडी झाली आहे.