Latest Marathi News
Ganesh J GIF

पतीच्या दुसऱ्या लग्नाचा डाव पहिल्या पत्नीने ‘असा’ लावला उधळून

पती पत्नी एकमेकांना हार घालणार इतक्यात घातला जोरदार राडा, पती आणि होणाऱ्या वधूची केली जोरदार धुलाई

अहमदनगर दि २३(प्रतिनिधी)- लग्न हा प्रत्येकाचा आयुष्यातील महत्वाचा क्षण असतो. पण काहीजण अनेकांचा विश्वासघात करुन एकापेक्षा अनेक विवाह करण्याचा प्रयत्न करतात. पण असा प्रयत्न करणाऱ्या एका नवरदेवाची पहिल्या पत्नीने थेट मंडपात दाखल होत चांगलीच धुलाई केली आहे. एवढेच नाही तर तिने नवरीला देखील चांगलाच चोप दिला आहे. या नवरदेवाच्या फजितीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. तसेच चर्चा देखील होत आहे.

पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता पती दुसऱ्या लग्नाच्या तयारीत असल्याचे पहिल्या पत्नीला कळल्यावर तिने थेट लग्नमंडपात जाऊन पतीला आणि होणाऱ्या नवरीला चांगलाच धडा शिकवत त्यांना पोलीस ठाण्यात खेचण्याची घटना अहमदनगर येथे घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जालनाच्या विशाल पवार याचे लग्न छत्रपती संभाजी नगरच्या मुलीसह १२ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. पण दोघांमध्ये सतत वाद होऊ लागल्याने विशालने आपल्या पत्नीला घरातून बाहेर काढले, त्यामुळे ती आपल्या माहेरी राहत होती. तसेच त्यांना एक मुलगाही आहे. पण आता विशालने पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या मुलीबरोबर उपनिबंधक कार्यालयात विवाह करून नंतर एका हॉटेलमध्ये लग्न सोहळ्याचे आयोजन केले होते. पण विशाल पवार हा अहमदनगर येथे दुसरा विवाह करत असल्याची माहिती पहिल्या पत्नीला मिळाली होती. त्यानंतर तिने आपल्या मुलासह आई-वडिल आणि नातेवाईकांना सोबत घेऊन नगर गाठले आणि ज्या मंगल कार्यालयात विशालचा दुसरा विवाह संपन्न होणार होता त्या ठिकाणी जाऊन गोंधळ घातला. पहिल्या पत्नीने नववधूला मारहाणही करण्यास सुरुवात केली. लग्नमंडपात उपस्थित असणाऱ्यांना काहीच समजायच्या आत हा गोंधळ सुरू झाला. त्यानंतर लग्नमंडपातूनच कोणीतरी पोलिसांना फोन केल्यानंतर काही वेळाने पोलीस त्या ठिकाणी आले आणि सर्व वरात पोलीस ठाण्याला नेण्यात आली. विशालवर पहिल्या पत्नी ने घटस्फोट न देता दुसरं लग्न करण्याची तक्रार दाखल केली असून पोलिसांनी विशालच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्याच्या पत्नीने केली आहे. आरोपी विशाल हा जालना जिल्ह्यातील रहिवासी आहे, तर त्याची नियोजीत वधू छत्रपती संभाजी नगरमधील रहिवासी आहे. मात्र पहिल्या पत्नीपासून दुसरे लग्न लपवण्यासाठी दोन्ही कुटुंबांनी नगरमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण पहिल्या पत्नीने तो प्रयत्न उधळून लावला आहे. विशेष म्हणजे वधू-वर एकमेकांच्या गळ्यात हार घालण्याच्या तयारीत असतानाच पहिल्या पत्नीने हे लग्न उधळून लावल्याने जोरदार चर्चा होत आहे.

”माझं लग्न २०११ मध्ये विशाल पवार या व्यक्तीसोबत झाले होते लग्नानंतर तो मला सतत त्रास देत होता. अडीच वर्षांपूर्वी त्याने मला घरातून हकलवून दिले. त्यानंतर मी माहेरी राहत होते. पण आम्हाला अचानक माहिती मिळाली की तो अहमदनगरमध्ये दुसरे लग्न करत आहे. त्यानंतर आम्ही त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मी दाखल केलेल्या तक्रारीनंतर त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे” अशी प्रतिक्रिया पहिल्या पत्नीने दिली आहे. या प्रकरणाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!