प्रियंका गांधी महाराष्ट्रातील या ठिकाणाहून लोकसभा निवडणूक लढवणार?
राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार? भाजपाच्या मिशन ४५ ला खीळ बसणार, काय असणार समीकरणे?
मुंबई दि ३(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्याचबरोबर विविध पक्ष्याचे प्रमुख नेते देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्राची भूमिका महत्वाची राहिलेली आहे. मध्यंतरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणुक लढवणार असल्याची चर्चा रंगली होती. पण आता या यादीत आणखी एका महिला नेत्याची भर पडण्याची शक्यता आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी या महाराष्ट्रातून लढण्याची शक्यता आहे. प्रियंका यांचे राजकीय सल्लागार आचार्य प्रमोद कृष्णम यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली आहे. आचार्य प्रमोद कृष्णम यांनी दिव्य मराठीला मुलाखत दिली. यावेळी ते म्हणाले की, प्रियंका गांधी या देशभरात सर्वाधिक लोकप्रिय नेत्या आहे. त्यात, कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे त्या महाराष्ट्रातूनही लोकसभा लढू शकतात. प्रियंका गांधी राज्यातून निवडणुका लढल्यास राज्यातील समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. प्रियंका गांधी या नांदेड मतदारसंघातून निवडणुक लढण्याची शक्यता आहे. कारण मध्यंतरी राहुल गांधी देखील नांदेड मतदारसंघातून निवडणुक लढवणार असल्याचा चर्चा रंगली आहे. आधी प्रियांका गांधी त्यांची आजी आणि देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवत तेलंगणातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. पण आता त्यांनी महाराष्ट्रातून राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. पण प्रियंका गांधी यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
कृष्णम यांच्या दाव्यानंतर राज्यातील काँग्रेसमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रियांका गांधी अतिशय आक्रमक नेत्या आहेत. त्यांच्यात इंदिरा गांधी यांची झलक दिसते असे अनेक काँग्रेसच्या नेत्यांना वाटते. त्यामुळे काँग्रेसला उभारी मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.