‘मी सांगतो ते करायचं, मी मुख्यमंत्र्यांचेही ऐकत नसतो तर बाकी काय’
शिंदे गटातील कॅबिनेट मंत्र्यांचे वादग्रस्त विधान, त्या वादग्रस्त विधानाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल
धाराशिव दि १०(प्रतिनिधी)- राज्यात शिंदे गट आणि भाजपाची सत्ता आल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत. तरीही त्यांच्या मुख्यमंत्री पदावर अनेकदा आक्षेप घेण्यात आले आहेत. तसेच त्यांना त्याच्या पक्षातील आमदार मंत्री जुमानत नसल्याचे नेहमी बोलले जाते. त्याचबरोबर सरकारमधील मंत्री देखील आपल्या वादग्रस्त विधानामुळे नेहमीच चर्चेत असतात. आताही शिंदे गटातील एका मंत्र्यांचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बद्दल विधान केले आहे.
वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. तसेच आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचेही एैकत नसल्याचे सांगत त्यांनी आपण एकनाथ शिंदेच्याही वरचढ आहोत, असे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तानाजी सावंत हे राज्याचे आरोग्य मंत्री व धाराशीव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. एका कार्यक्रमावेळी ते धाराशीवचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याशी बोलताना त्यांनी वादग्रस्त विधान केले आहे. या व्हिडीओतील सावंत कुलकर्णी यांना एक काम सांगत आहेत. यावर कुलकर्णी डिस्कस करु, असे म्हणतात. त्यावर नो डिस्कस, मी सांगीतले तर करायचे म्हणजे करायचे, मी मुख्यमंत्र्यांचेही ऐकत नाही तर बाकी काय, असे ते म्हणतात. पुन्हा त्याने काही राडा केला तर उचलून फेकू, नंतरचे नंतर बघू असेही तानाजी सावंत यांनी म्हटले आहे. वादग्रस्त पोलीस अधिकारी वासुदेव मोरे यांच्याबद्दल हे बोलणे सुरू होते. कमाल म्हणजे हा दबाव टाकल्यानंतर अवघ्या काही दिवसांत वादग्रस्त अधिकारी म्हणून ओळख असलेल्या वासुदेव मोरे या पोलीस अधिकाऱ्यांची स्थानिक गुन्हे शाखेच्या निरिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पण या संवादात आपण एकनाथ शिंदे यांचेही एैकत नसल्याचे म्हटल्यामुळे एकनाथ शिंदे याचा मंत्र्यांवर अंकुश आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान आरोग्यमंत्री असलेले तानाजी सावंत हे अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे अडचणीत येत असतात. हाफकिन माणसाकडून औषधं घेणे बंद करा असे विधान असेल किंवा आरक्षण कधी मिळेल हे सांगायला मी काही पंचांग घेऊन बसलो नाही, असे विधान असेल, तानाजी सावंत नेहमीच चर्चेत असतात. सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
अवैध दारू विक्रीला पाठीशी घालत असल्याचा ठपका ठेवत गृहमंत्र्यांच्या आदेशाने मोरे यांना निलंबित करण्यात आले होते. भाजप आमदार नमिता मुंदडा यांच्या तक्रारीवरून हे निलंबन करण्यात आले होते. मुंदडा यांच्या तक्रारीवरून निलंबित झालेल्या अधिकाऱ्याला आरोग्यमंत्री तानाजी सावंत पाठीशी घालत आहेत का? असा प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहे. त्यामुळे सत्ता पक्षातील बेबनाव समोर आला आहे.