मुंबई दि २२(प्रतिनिधी)- शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट हे मंत्रिपद न मिळाल्याने एकनाथ शिंदेंवर नाराज आहेत. नाकारल्यापासून नाराज आहेत. अनेक वेळा जाहीरपणे त्यांनी ती बोलूनही दाखवली आहे. पण आज सभागृहात दाखल होताच विरोधकांनी त्यांना चिमटे काढले आहेत.
विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यावेळी शिरसाट यांनी विधानसभा अध्यक्षांच्या अनुपस्थितीत तालिका सभापती म्हणून काम पाहिले.यावेळी विरोधी बाकावरील आमदारांनी त्यांचे स्वागत करत ‘चला काही तरी मिळाल’, अशी कोपरखळी मारली.यावेळी शिरसाट यांनीही “आज माझी वाट लावायची ठरवले आहे का?”असा सवाल केला. त्यामुळे सभागृहात चांगलाच हशा पिकला होता. शिंदे सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात आपण मंत्री होणार असा दावा शिरसाट यांनी केला होता.पण त्यांना डावलले गेल्यानंतर त्यांनी जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली होती. तसेच उद्धव ठाकरे यांचा फोटो ट्विट करत शिंदेनाही इशारा दिला होता. आता त्यांचे लक्ष आगामी मंत्रिमंडळ विस्ताराकडे असणार आहे.
ओैरंगाबाद जिल्ह्यातून अतुल सावे, अब्दुल सत्तार आणि संदिपान भुमरे अशा तीन नेत्यांना कॅबिनेट मंत्रिपदे मिळाली आहेत आता शिरसाट यांना मंत्रिपद दिल्यास इतर भागातील आमदार नाराज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिरसाट यांना मंत्रिपद मिळणार का नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.