
पुणे दि २४ (प्रतिनिधी)- पुण्यातील विश्रांतवाडीच्या आरएनडीईमध्ये रात्रीच्या अंधारात बिबट्या आढळून आला आहे. विश्रांतवाडी परिसरात कळस भागात असणाऱ्या लष्करी भागात बिबट्याचे दर्शन झाले आहे. नदीकाठचा हा भाग असल्याने जंगलाचा हा परिसर आहे. मध्यरात्री लष्कर भागात या भागात दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे .बिबट्या फिरत असल्याचे सीसीटीव्हीत फुटेज व्हायरल झाले आहे.
विश्रांतवाडी-आळंदी मार्गावर लष्कर विभागाचा सरावाचा आणि सोसायटीचा भाग आहे. त्यालगतच संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास लष्कराचे जवान या भागात पहारा देत असताना पथदिव्याच्या उजेडात बिबट्याचा वावर स्पष्टपणे दिसून आला. जवळपास १० ते १५ मिनिटे बिबट्या या परिसरात वावरत होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये त्याचा वावर कैद झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामूळे भीतीचे वातावरण पसरले आहे. त्याचबरोबर जवानांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
बिबट्या पाहून लष्कराच्या जवानांनी त्याला हाकलण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. लष्कराची संरक्षक भिंत असल्यामुळे त्याला भर वस्तीत येता आलं नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. पण बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अधी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.