मुंबई दि २६ (प्रतिनिधी) – मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये ईडीच्या अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख तुरुंगात चक्कर येऊन पडले आहेत. त्यांना तातडीने जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचा रक्तदाब वाढल्यामुळे चक्कर आली.सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर १७ ऑगस्टला मुंबई उच्च न्यायालयात ईडीच्यावतीने युक्तीवाद करण्यात येणार होता. पण आता ती सुनावणी २९ ऑगस्टला होणार आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अनिल देशमुख यांना गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती. देशमुख यांना याआधी देखील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या खांद्याचे दुखणे वाढले होते. तसेच त्यांना वेगवेगळे आजार देखील आहेत. त्यामुळे त्यांच्या खांद्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.आजच्या घटनेबाबत रुग्णालय प्रशासनाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे २९ ऑगस्टला होणाऱ्या जामीन अर्जाच्या सुनावणीत त्यांना न्यायालय दिलासा देणार का? याकडे लक्ष असणार आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी मुंबईतील मोठमोठे डान्सबार आणि रेस्टॉरंट मालकांकडून दर महिन्याला 100 कोटी रुपये वसूल केले, असा धक्कादायक आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. त्यांनी याबाबतचं पत्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पोलीस महासंचालकांना पाठवलं होतं. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती.