गुलाम नबी आझाद राजकारणाची नवी इनिंग सुरु करणार
नवी राजकीय घोषणा करतानाच राहुल गांधीवर जोरदार हल्लाबोल
दिल्ली दि २६ (प्रतिनिधी) – काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर ते भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा होती. पण अनपेक्षित धक्का देत त्यांनी नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
आपल्या नव्या राजकीय इनिंगविषयी बोलताना आझाद म्हणाले की, “मी जम्मू-काश्मीरला जाणार आहे. मी राज्यात माझा स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करणार आहे. त्यानंतर संबंधित पक्ष राष्ट्रीय स्तरावर आणण्याबाबत चाचपणी करू. राहुल गांधी यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर आणि खासकरुन जानेवारी २०१३ मध्ये त्यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर याआधी असलेली सल्लागार यंत्रणा पूर्णपणे नष्ट करण्यात आली आहे.सोनिया गांधी फक्त नावालाच अध्यक्ष आहेत कारण महत्वाचे निर्णय राहुल गांधीच घेतात आमच्या पत्राचीही दखल घेतली गेली नाही. राहुल गांधींनी प्रसारमाध्यमांसमोर सरकारी अध्यादेश फाडला हे फारच बालिशपणाचं होत २०१४ च्या निवडणुकीत झालेल्या पराभवात याचा मोठा वाटा होता असा आरोपही आझाद यांनी केला आहे.
आझाद यांनी शुक्रवारी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला. अलीकडच्या काही महिन्यांत अनेक प्रमुख राजकीय नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. त्यामुळे हा काँग्रेस पक्षाला आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे.