मंडल आयोगाने ओबीसींना १४ टक्के आरक्षण दिले होते. तेच १४ टक्के आरक्षण ओबीसींना मिळायला हवे. मराठ्यांच्या गरीब मुलांना मिळायला लागल्यावर यांचा थयथयाट होऊ लागला आहे.लहान भाऊ म्हणून आम्ही ओबीसींना मिळालेल्या आरक्षणाबाबत काही बोललो नाही. मी माझ्या समाजाची खंबीरपणाने पाठराखण करतो. यांचे विचार आणि नियत उघडी पडली आहे. यांचा जातीयवाद उघडा पडला आहे. मी जातीयवाद केला नाही. फक्त मागण्या लावून धरल्या आहेत, या शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी लक्ष्मण हाके यांच्या मागणीच्या मुद्द्यावर हल्लाबोल केला.
कुणबी नोंदी रद्द करा, अशी मागणी करायची नाही. काही झाले तरी ५८ लाख कुणबी नोंदी रद्द होणार नाहीत. लक्ष्मण हाके मराठा समाजाची राख करायला निघाले आहेत. मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळायला हवे. सगळ्या ओबीसी नेत्यांचे खोटे मुखवटे उघडे पडले. गोरगरीब ओबीसी बांधवांचे वाटोळे करायची माझी इच्छा नाही. पण वेळ आल्यास मंडल आयोगाला आव्हान दिल्याशिवाय राहणार नाही. मी संयम धरला आहे. मराठा समाजालाही शांत राहण्याचे आवाहन मनोज जरांगे यांनी केले. ते पत्रकारांशी बोलत होते.
मराठा समाजातील नेत्यांनी ओबीसी समाजाच्या नेत्यांकडून शिकायला हवे. तुम्हीच तुमच्या समाजातील मुलांचे वाटोळे करायला निघाला आहात. मूळ नोंदी सापडूनही ते रद्द करा म्हणत आहेत. आपल्या हक्काचे आरक्षण दाबायला निघाले आहेत. ओबीसी नेत्यांचे खरे विचार मी जगासमोर आणले आहेत. हेच जातीयवाद करत आहेत. मी समाजासोबत प्रामाणिक राहिलो, यामुळेच यांची पोटदुखी आहे. समाजावर अन्याय होऊ देणार नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला. मात्र, मराठ्यांवर अन्याय करू नका. ओबीसी नेत्यांच्या दबावाला बळी पडून तुम्ही मराठ्यांवर १०० टक्के अन्याय करणार आहात. मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात ते आरक्षण देणार, असे मुख्यमंत्री का सांगत नाहीत, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला.दरम्यान, आम्ही एकटे ५० ते ५५ टक्के आहोत. कसे आरक्षण मिळत नाही, तेच पाहतो. मराठा समाजाला फसवले, तर तुम्हाला बुडवलेच म्हणून समजा. हे लक्षात ठेवा. आधी मराठा समाज एकत्र नव्हता. निर्णय घ्यायला अडचणी येत होत्या. आता समाज एक झाला आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.