
वडिलांना धमकी देताना मध्यस्थी करणे मुलाच्या जीवावर बेतले ; मुलाला लोखंडी रॉडने मारहाण करुन केले गंभीर जखमी
वडिलांना धमकी दिल्याने मध्यस्थी केल्याने मुलावर दारुड्याने कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याच्या साथीदाराने तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केले. या घटनेत विद्याधर नायर हा गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत महेश सुभाष त्र्यंबके (वय २५) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अमित शेख, अक्षय गायकवाड, किरण माने व त्यांच्या एक साथीदार अशा चौघांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कात्रज कोंढवा रोडवरील जयशंकर टायर्स येथे २४ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ ते पावणे नऊ दरम्यान घडली.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे गॅरेज आहे. तेथे टायर पंक्चर काढण्याचे काम विद्याधर नायर करतात़ अमित शेख हा दारु पिऊन गॅरेजवर आला होता. त्याने विद्याधर नायर यांच्या वडिलांना धमकी दिली. तेव्हा विद्याधर याने मध्यस्थी करुन त्याला समजावून पाठवून दिले होते.
त्याचा राग मनात धरुन अमित शेख हा इतर साथीदारांना घेऊन आला. अमित शेख याने विद्याधर याला “तुला खल्लास करतो,” असे म्हणून त्यांच्या डोक्यावर, डाव्या हातावर, बरगडीवर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. त्यांच्या साथीदारांनी “हा पण होता साला संपवून टाकु” असे म्हणून फिर्यादी यांना मारहाण केली. तसेच विद्याधर याच्या वडिलांना अक्षय व किरण यांनी लोखंडी रॉडने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सहायक पोलीस निरीक्षक समीर शेडे तपास करीत आहेत.