अनैतिक संबंधात अडसर ठरला पती! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केला पतीचा शेवट ;दोघांना अटक, ४८ तासात पोलिसांकडून घटना उघडकीस
स्वत: गळा दाबून घेऊन त्यांनी आत्महत्या केली, असा कांगावा करुन आपले कृत्य पत्नी लपवू पहात होती. परंतु, पोलिसांनी त्यांच्या मुळ गावी जाऊन माहिती काढली. तसेच स्वत: कोणीही गळा दाबून घेऊन आत्महत्या करु शकत नाही, हे डॉक्टरांनी स्पष्ट केल्याने अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला. भारती विद्यापीठ पोलिसांनी ४८ तासात हा प्रकार उघडकीस आणून पत्नी व प्रियकराला अटक केली.
राणी गोपीनाथ इंगुळकर (वय ३२) आणि नितीन शंकर ठाकर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गोपीनाथ बाळु इंगुळकर (वय ३७) यांना बेशुद्ध अवस्थेत भारती हॉस्पिटलमध्ये २३ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता आणले होते. डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मयत घोषित केले. शवविच्छेदनात गळा दाबल्याने मृत्यु झाल्याचे निष्पन्न मिळाले. त्यांची पत्नी राणी ही त्यांनी स्वत: गळा दाबून घेऊन आत्महत्या केल्याचे सांगत होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील यांनी तपास पथकाचे प्रमुख समीर कदम यांना चार वेगवेगळी पथक तयार करायला सांगितली.सहायक फौजदार नामदेव रेणुसे व सतिश मोरे यांनी इंगुळकर याच्या घराच्या ठिकाणी तसेच त्यांच्या पत्नीच्या वेल्हे तालुक्यातील मुळ गावी जाऊन गोपनीयरित्या माहिती घेतली. त्यात राणी हिचे बाहेर अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली.
तेव्हा पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. माझा पती हा स्वत: आपला गळा दाबत होता, असे सांगितले. याचा संशय आल्याने अधिक सखोल तपास करुन त्यांना विश्वासात घेतले असता तिने तिचा प्रियकर नितीन शंकर ठाकर याच्याशी संगनमत करुन गोपीनाथ इंगुळकर यांचा दोघांनी मिळून हात पाय धरुन गळा दाबून खून केल्याची कबुली दिली. नितीन ठाकर हा गावी पळून जाणार असल्याची माहिती सहायक फौजदार नामदेव रेणुसे व सतिश मोरे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी स्वारगेट येथे सापळा लावून नितीन ठाकरे याला पकडले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी ४८ तासात गुन्हा उघडकीस आणला आहे. राणी इंगुळकर आणि नितीन ठाकर यांचे गेल्या १० वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पतीचा अडसर होत असल्याने दोघांनी कट रचून खून केल्याची कबुली दिली आहे.