लाडकी बहीण योजना महायुतीसाठी ठरली गेमचेंजर ; श्रीवर्धनमध्ये अजित पवार गटाच्या उमेदवार आदिती तटकरे यांचा विजय
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत आतापर्यंत हाती आलेल्या आकड्यानुसार, सत्ताधारी महायुतीचा दणदणीत विजय होत असल्याचं चित्र आहे.राज्यातील २८८ पैकी २२० हून अधिक मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली आहे तर महाविकास आघाडीला दारुण पराभवाचा समान करावा लागणार असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच राज्यातील पहिला निकाल हाती आला असून श्रीवर्धन मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार आदिती तटकरे यांचा विजय निश्चित झाला आहे.
आदिती तटकरे यांनी १५ व्या फेरीअखेर ५४ हजारांहून अधिक मतांची आघाडी घेतली आहे. आदिती तटकरे यांनी ७७ हजार ४३८ मते घेतली असून त्यांच्याविरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अनिल नवगणे यांना अवघी २१ हजार १३७ मते मिळाली आहेत. त्यामुळे आदिती तटकरे यांचा विजय होणार, हे निश्चित झालं आहे. महाराष्ट्रात महायुतीच्या विजयामागे सरकारने राबवलेली लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरल्याचं बोललं जात आहे.
महायुती सरकारमध्ये महिला आणि बालविकास मंत्री असलेल्या आदिती तटकरे यांचाही ही योजना राबवण्यात हातभार होता.त्यामुळे लाडक्या बहिणींनी आदिती तटकरेंचा विजय निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचं दिसत आहे.दरम्यान, भाजपच्या १२५ जागा, शिवसेनेच्या ५५ जागा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ३५ जागांवर आघाडी आहे. या निकालात महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाला आहे. मविआतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीला १३ जागा आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला १७ जागांवर आघाडी आहे. तर काँग्रेस २१ जागांवर आघाडी आहे.