
पुण्यात नशेखोर तरुणाची वाहतूक पोलिसाला मारहाण
पुण्यात पोलीसच असुरक्षित, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल, कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा?
पुणे – पुण्यातील मगरपट्टा परिसरात एका नशेखोर तरुणाने भररस्त्यात वाहतूक पोलिसांना मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आरोपी तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नशेत असून मगरपट्टा येथे रस्त्यावर हुल्लडबाजी करत होता. या ठिकाणी कर्तव्य बजवात असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याने त्याला हटकले. मात्र, त्यामुळे राग अनावर झाल्याने आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत त्यांना मारहाण केली. यानंतर स्थानिकांनी हस्तक्षेप करत नशेखोर तरुणाला थांबवले. या घटनेची माहिती मिळताच हडपसर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक आणि हडपसर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन आरोपीला ताब्यात घेतले. रात्री उशीरापर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.मात्र, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नशेखोर तरुण मगरपट्टा भागात एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करत होता. तसेच या रस्त्यावरून जात असलेल्या अनेकांना तो दगड सुद्धा फेकून मारहत होता. या ठिकाणी आपले कर्तव्य बजावत असलेले वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचाऱ्यांनी तरुणाला हाटकले. त्यामुळे आरोपीने पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान पोलीसांवर हल्ले वाढले आहेत. कारण आळंदी वाहतूक शाखेतील सहायक पोलिस उपनिरीक्षक अंकुश वाडेकर यांनाही एका तरुणाने आठवडाभरापुर्वी मारहाण केली होती. तसेच याआधीही पोलीसांवर हल्ले होण्याच्या घटना घडल्या आहेत. सोशल मीडियावर मात्र याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
https://x.com/harish_malusare/status/1878111602848977157?t=R3kpW8YkaEJgsBCJhI-Zow&s=19
गेल्या काही काळापासून पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाल्याचे दिसत आहे. जामिनावर सुटलेल्या एका गुंडाची रॅली काढण्यात आली होती. तर एका तरुणीवर कोयत्याने हल्ला करत हत्या करण्यात आली होती. त्यामुळे सामान्य नागरिक भयभीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.