Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यात ‘भोंदू गुरुवर्य’ महिलेचा पर्दाफाश!; कौटुंबिक अडचणी दूर करण्याच्या नावाखाली ४५ हजारांचा गंडा

शिक्षण आणि तंत्रज्ञानाची पंढरी असलेल्या पुण्यातून भोंदूगिरीचा आणखी एक गंभीर प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावरून प्रसिद्धी मिळवत ‘कौटुंबिक अडचणी अन् पीडा दूर करते’ असे आमिष दाखवून एका महिलेने सोलापूरच्या बांधकाम व्यावसायिकाला तब्बल ४५ हजार रुपयांना गंडवले आहे. पुण्यातील बिबवेवाडी परिसरात घडलेल्या या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी संबंधित महिला आणि तिच्या चार साथीदारांवर फसवणुकीसह ‘जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत’ गुन्हा दाखल केला आहे.

सोशल मीडियावरील रील्स आणि व्हिडिओंद्वारे भुलवले

तक्रारदार सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील रहिवासी असून ते बांधकाम ठेकेदार आहेत. भोंदू महिलेने सोशल मीडियावर स्वतःचे ‘गुरुवर्य’ म्हणून वर्णन करणाऱ्या अनेक चित्रफिती (व्हिडिओ) प्रसारित केल्या होत्या. कौटुंबिक अडचणी, आजारपण आणि घरातील पीडा दूर करण्याचे दावे या व्हिडिओंमध्ये करण्यात आले होते. डिसेंबर २०२५ मध्ये तक्रारदार या व्हिडिओंच्या प्रभावाखाली येऊन महिलेच्या संपर्कात आले.

हळदी-कुंकू, बाहुली पाठवून ‘मृत्यूची भीती’ दाखवली

सुरुवातीला महिलेने तक्रारदाराला हळदी-कुंकू, बाहुली आणि मंत्रांचा दोरा पाठवला. त्यानंतर बिबवेवाडीतील सुखसागरनगर भागात असलेल्या आपल्या घरी बोलावून घेतले. “तुमच्या घरावर मोठी पीडा आहे, उतारा टाकावा लागेल, नाहीतर कुटुंबात मृत्यू ओढवेल,” अशी गंडवणारी भीती दाखवून महिलेने तक्रारदाराकडून रोख आणि ऑनलाइन स्वरूपात ४५ हजार रुपये उकळले.

पैसे परत मागितल्यावर मारहाणीची अन जिवे मारण्याची धमकी!

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने विचारणा केली असता, भोंदू महिलेने आणि तिच्या साथीदारांनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण करण्याची अन् जिवे मारण्याची धमकी दिली. अखेर पीडिताने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत आपबिती कथन केली.

पाच जणांवर गुन्हा; अनेकांची फसवणूक झाल्याचा संशय

बिबवेवाडी पोलिसांनी या प्रकरणी महिला आणि तिच्या चार साथीदारांवर:

महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा तसेच भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध फसवणुकीच्या कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. या महिलेने सोशल मीडियाच्या जाळ्यात ओढून आणखी अनेक नागरिकांना अशाच प्रकारे फसवल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!