माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे निधन
कर्करोगाशी झुंज अपयशी, साहित्य क्षेत्रातही भरीव योगदान, बीड व सोलापूरशी होते घट्ट नाते
मुंबई – ज्येष्ठ साहित्यिक-लेखक, सेवानिवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती.
नरेंद्र चपळगावकर यांचा जन्म १९३८ सालचा. ते सोलापूर जिल्ह्यातील चपळगाव येथील असले तरी त्यांच्या कुटुंबाच्या गेल्या काही पिढ्या बीड येथे गेल्यामुळे ते मूळचे बीडचेच झाले. चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे माजी न्यायमूर्ती होते. ते वर्धा येथे झालेल्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे अध्यक्षही होते. वैचारिक लेखन करणारे एक संवेदनाशील व सत्त्वशील मराठी लेखक म्हणून त्यांची ख्याती राहिली. न्यायाधीश होण्यापूर्वी ते सन १९६१-६२मध्ये ते लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे पहिले प्रमुख होते. नंतर ते छत्रपती संभाजीनगर येथील माणिकचंद्र पहाडे विधि महाविद्यालयातही अध्यापनाचे काम केले. २८ वर्षे वकिली व्यावसाय केल्यानंतर १९ जानेवारी १९९० रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी त्यांची निवड झाली. न्यायालयीन सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी मराठी साहित्यात मोठी भूमिका बजावली. न्यायाच्या गोष्टी, संघर्ष आणि शहाणपण, तीन न्यायमुर्ती आणि त्यांचा काळ, कायदा आणि माणूस, समाज आणि संस्कृती, सावलीचा शोध आदी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. मराठवाड्यातील साहित्य आणि वाड्मयीन विश्वाला वळण देण्यात न्यायमूर्ती चपळगावकरांचा मोठा वाटा राहिला. त्यांना राजहंसचा श्री. ग. माजगावकर स्मृती हा वैचारिक लेखनासाठी पुरस्कार, मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे जीवन गौरव पुरस्कार ,महाराष्ट्र फाऊंडेशन या संस्थेचा दिलीप चित्रे स्मृती पुरस्कार आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळाचा राम शेवाळकर स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.
नरेंद्र चपळगावकर यांचे वडील पुरुषोत्तम चपळगावकर हे काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष होते. स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी सहभाग घेतला होता. न्या. नरेंद्र चपळगावकर यांचे पार्थिव आज दुपारी ३ च्या सुमारास त्यांच्या जयनगर येथील निवासस्थानी आणण्यात येईल आणि सायंकाळी ४ वाजता अंत्ययात्रा निघून साडेचार वाजता अंतिम संस्कार प्रतापनगर येथे केले जातील.