शिवसेनेच्या कार्यकारणीतील खासदार शिंदे गटात प्रवेश करणार?
एकनाथ शिंदेची भेट घेतल्याने चर्चेला उधान, शिवसेनेला मोठा धक्का?
मुंबई दि ६(प्रतिनिधी) – शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी सोमवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सरकारी निवासस्थान वर्षावर भेट घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेचा आणखी एक खासदार शिंदे गटात सामील होणार का याच्या चर्चांना उधाण आलं आहे. नुकतीच कीर्तीकर यांच्या मुलाला शिवसेनेने महत्वाचे स्थान दिलेले आहे.
गजानन किर्तीकर शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे ते शिंदेंबरोबर गेल्यास शिवसेनेच्या महत्त्वाची संघटनेत फूट पडू शकते. स्थानिय लोकाधिकार समिती शिंदे गटाबरोबर गेल्यास त्याचा मोठा फायदा शिंदे गटाला होऊ शकतो. त्याचबरोबर गजानन किर्तीकर हे पक्षाच्या नेतेपदी असल्यामुळे शिवसेना कार्यकारणीत फूट पडल्याचे शिंदे यांना दाखवता येणार आहे. कीर्तीकर शिंदे गटात गेल्यास अनेक जुने शिवसैनिक ठाकरेंची साथ सोडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे माजी नगरसेवक अमेय घोले हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
शिवसेनेतील बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे आणि गजानन किर्तीकर यांच्यातील ही दुसरी भेट आहे. याआधी मुख्यमंत्री शिंदे स्वतः किर्तीकरांच्या घरी जाऊन त्यांना भेटले होते. त्यावेळी गजानन किर्तीकर यांची प्रकृती खराब होती. आता स्वतः किर्तीकर वर्षावर गेल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत.