
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या
अनैतिक संबंधात पतीचा अडसर, खून करुन रचला अपघाताचा बनाव, या कारणामुळे कट उधळला
अ. नगर – अनैतिक संबंधाच्या आड येत असलेल्या पतीची परप्रांतीय प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची घटना महाराष्ट्रातील अहिल्यानगरमध्ये घडली आहे. पोलिसांनी यशस्वीपणे याचा छडा लावत पत्नीला अटक केली आहे.
पारनेर तालुक्यातील काळेवाडी येथील बाबाजी गायखे असं खून झालेल्या पतीचं नाव आहे. तर सुप्रिया गायखे असे पत्नीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निघोज ते पाबळ जाणारे रोडवर अज्ञात व्यक्तीचा अपघात होऊन त्याचा मृत्यू झाल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला, त्यात मयताचा मृत्यू हा अपघाताने नसून, त्यास कोणत्या तरी हत्याराने डोक्यात मारल्याने झाल्याचे त्यात नमूद करण्यात आल्यानंतर पुढील तपास सुरू झाला. सुप्रिया आणि जनकभाई भिडभिडिया यांचे अनैतिक संबंध होते याची कुणकुण बाबाजीला झाली, त्यामुळे सुप्रिया आणि तिच्या प्रियकराने बाबाजीचा काटा काढायचे ठरवले. त्यांनी रविवारी डोक्यात वार करत बाबाजीचा खून केला. त्यानंतर पतीचा मृतदेह मोटारसायकलवरून निघोज ते पाबळ रस्त्यावर टाकून पत्नीने अपघाताचा बनाव केल्याचे पोलिस तपासात उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आधी पत्नीला अटक केली. त्यानंतर तिने या गुन्ह्याची कबुली दिल्याने फरार प्रियकरालाही गुजरातमधून पकडले. मयताचे वडील शिवाजी गायखे यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणाचा पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नितीन खंडागळे, पोलिस उपनिरीक्षक रणजित मारग, गहिनीनाथ यादव, विवेक दळवी, गोर्वधन जेवरे, जालिंदर लोंढे या पथकाचा समावेश होता.