
जंगली गव्याने रिक्षाला धडक देत रिक्षाच उडवली मग काय..
धडकी भरवणारा ‘हा’ व्हिडीओ सोशल मिडीयावर होतोय व्हायरल
रत्नागिरी दि १२ (प्रतिनिधी) – कोकणातील असनिये गावात एका रिक्षाला गवा रेड्याने धडक देत रिक्षा उलटून टाकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे ग्रामीण भागात भितीचे वातावरण पसरले आहे. पण वनविभागाने नागरिकांना न घाबरण्याचे आवाहन केले आहे. तसेच व्हायरल व्हिडिओ महाराष्ट्रातील नसल्याचे सांगितले आहे. पण व्हिडिओ मात्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
गवा रेडा रिक्षाला ठोकर देऊन ती उलटून टाकतानाचा व्हिडिओ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांची नावे टाकून व्हायरल होत आहे. त्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले होते. पण वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की,” या परिसरात गवा रेडाने कोणतीही रिक्षा उलटून टाकलेली नाही. त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये. मात्र, हा व्हिडिओ केरळ किंवा कर्नाटक राज्यातील असावा,” असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. कोकणात गव्यांनी धिंगाना घातला आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत.पण आता गव्यांनी आपला मोर्चा मोकळ्या रस्त्यांवर वळवला आहे. ही जुनीच समस्या असून देखील लोकप्रतिनिधी आणि प्रशासन लक्ष देत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कोकणात प्राण्यांचा त्रास पूर्वीपासून आहे.अगोदर शेतकऱ्यांकडे शेती संरक्षण बंदूक असायची. त्यामुळे शेतीवर माच घालून शेतकरी वन्य प्राणी पळवून लावायचे. मात्र, मागील दोन तीन वर्षांपासून जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी आडमुठे धोरण राबवले आहे. त्यामुळे बंदूक परवाने नुतनीकरण झालेले नाही. त्यामुळे शेतकरी नाराज आहेत.