
महागाई! पेट्रोल लवकरच १५० रुपये लिटर होणार?
कच्चा तेलाच्या किमतीत विक्रमी वाढ,सर्वसामान्य होरपळणार, पेट्रोल डिझेल का महागणार?
दिल्ली – महागाई कमी झाल्याचा दावा रिझर्व्ह बॅक करत असली तरी लवकरच महागाई वाढण्याची स्थिती निर्माण झाली आहे. इस्रायल आणि इराणमधील तणाव वाढल्याने कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल देखील महागणार आहे.
दोन देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १५० डाॅलरपर्यंत पोहोचू शकतात. इस्रायलनेइराणवर हल्ला केल्याच्या बातमीनंतर शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत ७ टक्क्यांनी मोठी वाढ नोंदवली गेली. भारतात तेलाच्या गरजेच्या सुमारे ८० टक्के तेल आयात केले जाते. पण मध्य पूर्वेतील वाढत्या संघर्षामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे तेल वाहतुकीत संभाव्य व्यत्यय येण्याची चिंता वाढली आहे. इराणला अरबी समुद्र आणि हिंदी महासागराशी जोडणारा हा एकमेव दुवा मानला जातो. ही भारतासाठी चिंतेची बाब मानली जात आहे. कारण यामुळे पेट्रोल- डिझेलचे दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटले आहे की येत्या काही महिन्यांत पुरेल इतका देशात पेट्रोल, डिझेल, जेट इंधन आणि एलपीजी सारख्या पेट्रोलियम उत्पादनांचा पुरेसा साठा आहे. पण युद्ध सुरूच राहिल्यास पेट्रोल डिझेल आणखी महाग होण्याची शक्यता आहे. इराण जगातील तिसऱ्या क्रमांकाचा तेल उत्पादक देश आहे. शिवाय इराणचे भौगोलिक स्थानही अत्यंत महत्त्वाचे आहे. येथे ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’ ही एक जलवाहतूक मार्गिका आहे, जिथून सौदी अरेबिया, कुवेत, इराक यासारख्या देशांचा तेल पुरवठा होतो. जर इराणने हा मार्ग बंद केला, तर जगातील सुमारे २० टक्के तेल पुरवठा थांबू शकतो. यामुळे तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे.
गेल्या आठवड्यात इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्याचा इंधनाच्या किमतींवर मोठा परिणाम झाला. त्यामुळे कच्च्या तेलाच्या आणि नैसर्गिक वायूच्या किमतीत मोठी वाढ झाली, कारण पश्चिम आशियात पुन्हा एकदा मोठा संघर्ष होण्याची भीती निर्माण झाली. हल्ल्यांनंतर ब्रेंट कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल ७८.५ डॉलरपर्यंत वाढल्या आहेत.