
‘या’ कारणामुळे झाला अहमदाबादचा विमान अपघात
अहमदाबाद विमान अपघाताचे धक्कादायक कारण समोर, काॅकपीटमधील संभाषणातून मोठा खुलासा
अहमदाबाद – अहमदाबाद विमान अपघात कसा झाला याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. खरं तर या विमान अपघाताला १ महिना पूर्ण झाला आहे. मागील महिनाभरापासून या विमान अपघाताबाबत चौकशी आणि तपास सुरु होता. आता हा चाैकशी अहवाल सार्वजनिक करण्यात आला आहे.
एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने जारी केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की उड्डाणानंतर काही सेकंदात दोन्ही इंजिनचे इंधन अचानक बंद झाले. त्यामुळे विमान नियंत्रणाबाहेर गेले आणि क्रॅश झाले. विमानाच्या “ब्लॅक बॉक्स” रेकॉर्डरमधून ४९ तासांचा उड्डाण डेटा आणि अपघातातील दोन तासांचा कॉकपिट ऑडिओ डेटा काढण्यात आल्यानंतर याबाबतचा खुलासा झाला आहे. दोन्ही इंजिनांचे इंधन कटऑफ स्विच “०१ सेकंदाच्या अंतराने एकामागून एक बंद झाले. तेव्हा विमानाचा वेग १८० नॉट्सवर पोहोचला होता. कॉकपिटच्या व्हॉइस रेकॉर्डिंगमध्ये, एका वैमानिकाला विचारताना ऐकू येते की त्याने विचारले की इंजिन कटऑफ का केला. दुसऱ्या वैमानिकाने मी कट ऑफ केलं नाही असं उत्तर दिले. काही वेळातच, स्विचेस जिथे असायला हवे होते तिथे परत आणण्यात आले आणि जेव्हा अपघात झाला तेव्हा इंजिन पुन्हा पॉवर अप करण्याच्या प्रक्रियेत होते. खरं तर ७८७ ड्रीमलायनर आणि इतर व्यावसायिक विमानांमध्ये एकाच इंजिनवर टेकऑफ पूर्ण करण्यासाठी पुरेशी पॉवर असते आणि वैमानिक त्यासाठी सज्ज सुद्धा असतात. परंतु दोन्ही दोन्ही इंजिनचे इंधन अचानक बंद झाल्याने वैमानिक काहीच करू शकला नाही. इंजिन पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केल्यानंतर काही सेकंदांनी, वैमानिकाने “मेडे मेडे मेडे” असा कॉल दिला. एअर ट्रॅफिक कंट्रोलने कॉल साइनबद्दल चौकशी केली. परंतु त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि तोपर्यंत विमान खाली कोसळले.अहवालात हेच स्पष्ट झालं आहे की दोन्ही इंधन स्विच अचानक बंद होणे हे या विमान अपघाताचे मुख्य कारण आहे. एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाचे मुख्य वैमानिक सुमीत सभरवाल आणि सह-वैमानिक क्लाइव्ह कुंदर होते, दोघांनाही विमान उड्डाणाचा पुरेसा अनुभव होता. सभरवाल यांना बोईंग विमान उड्डाणाचा ८,६०० तास तर कुंदर यांना १,१०० तासांहून अधिक विमान उड्डाणाचा अनुभव होता. उड्डाणापूर्वी दोन्ही वैमानिकांना पुरेसा विश्रांतीचा कालावधी मिळाला होता, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
बोईंग ७८७-८ ड्रिमलायनर विमानाने अहमदाबाद विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर काही सेकंदात त्याचे इंजिन निकामी झाल्यामुळे बी.जे. मेडिकल कॉलेजच्या होस्टेलवर कोसळले होते. एअर इंडियाचे हे विमान १२ जून रोजी अहमदाबादहून लंडनला निघाले होते. या अपघातात २६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.