जानबा काकांच्या प्रेमळ आपुलकीने सुप्रिया सुळे भावूक
बारामती आणि पवार या समीकरणाची साक्ष देणारा व्हीडीओ व्हायरल
पुणे दि १५ (प्रतिनिधी)- शरद पवार यांनी नेहमी बेरजेचे राजकारण केले.त्यामुळे त्यांनी राजकारणात मोठ्या पदांबरोबर माणसं देखील कमावली त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे या देखील आपल्या वडिलांप्रमाणे ही नाती जपताना दिसत असतात. सध्या त्यांचा एक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. यातुन बारामती मतदारसंघात सुळे यांनी लोकांच्या ह्रदयात घर गेल्याचे दिसून आले आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे पुणे जिल्ह्यातील भोर गावातील जवळचे सहकारी जानबा पाठरे हे खास सुप्रिया सुळे यांच्यासाठी अळू वडीचा डबा घेऊन आले होते. शरद पवार बारामतीचे खासदार असताना जेंव्हा जेंव्हा शरद पवार या मार्गावरून जात तेंव्हा पाठरे पवारांना आपुलकीने डबा देत.सुप्रिया सुळे या २००९ पासून बारामती मतदारसंघाच्या खासदार आहेत. पण पठारे यांनी त्यांनीही डबा देत नेता आणि जनता यांचे नाते कसे असावे याचा दाखला घालून दिला आहे. सुळे यांनी एक पोस्ट करत ही घटना सांगितली आहे त्यात त्या म्हणतात, “हे नाते आपुलकीचे आहे. भोर तालुक्यातील आपटी या गावचे जानबा पारठे हे आदरणीय पवार साहेबांचे जुने सहकारी आहेत. मी जेव्हा त्या मार्गावरुन जाते तेव्हा हे काका माझी वाट पाहत थांबलेले असतात. ते माझी विचारपूस करतात आणि अतिशय प्रेमाने अळूची वडी व भाकरीचा डबा देतात. ही साधी पण आपुलकी व प्रेमाने ओथंबलेली भेट…. आवर्जून नमूद करायची बाब म्हणजे ते साहेबांना देखील असाच डबा देतात. अगदी मध्यंतरी ते दिल्लीला जाऊन आले तेव्हा त्यांनी साहेबांसाठी खास हा डबा बांधून आणला होता. ही प्रेमळ भेट तर आहेच पण त्याहीपेक्षा मोठा तो आशीर्वाद देखील आहे. या प्रेमाबद्दल मी कृतज्ञ आहे. धन्यवाद…” पारठे यांनी दिल्लीत जावूनही शरद पवारांना हा, आपुलकीचा डबा दिला आहे.
खासदार सुप्रिया सुळे सध्या पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या भावनिक पोस्टवर त्यांच्या हितचिंतकांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. शरद पवारांवरचं आणि त्याच्या कुटुंबीयांवर कार्यकर्त्यांचं प्रेम या प्रतिक्रियांच्या माध्यामातून लक्षात येतं. ‘हे प्रेम आहे ताई नशिबाने मिळतात अशी माणसं’, हीच खरी संपत्ती आहे, अशा अनेक प्रतिक्रिया त्याच्या पोस्टवर अनेकांनी केल्या आहेत.