
गोट्या खेळायला आलोय का जो काम करतो त्याचीच मारता का?
अजित पवार यांची जीभ पुन्हा घसरली, कर्जमाफीची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांनाच सुनावले, अतिवृष्टी जाहीर करण्यासही नकार(Video)
धाराशिव – अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात मोठं नुकसान झालं आहे. शेती खरडून गेली आहे. तर शेतकऱ्याचं दिवाळीपूर्वी दिवाळं निघालं आहे. आभाळ फाटल्यानं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. त्यामुळे सरसकट कर्जमाफी आणि अतिवृष्टी जाहीर करण्याची मागणी होत आहे, असे असताना मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे, पण यावेळी अजित पवार यांची जीभ घसरली आहे.
अजित पवार धाराशिव दौऱ्यावर असताना शेतकऱ्यांनी कर्जमाफीसंदर्भात सवाल उपस्थित केला असता ते शेतकऱ्यावरच घसल्याचे चित्र पाहायला मिळाले. अजित पवार पुरग्रस्तांना मार्गदर्शन करत असताना एका तरुण शेतकऱ्याने त्यांना कर्जमाफीबाबत थेट विचारणा केली. कर्जमाफीचा विषय काढताच पवार भलतेच भडकले. ते म्हणाले, अरे बाळा सकाळी सहा पासून काम करतोय. आम्ही काय इथं गोट्या खेळायला आलोय का? यालाच मुख्यमंत्री करा रे असं सांगत मुळ प्रश्नाला बगल देत पुढे म्हणाले, जो काम करतो त्याचीच मारता का? अशा शब्दात त्यांनी उलट विचारणादेखील केली. पण त्याचबरोबर सगळं करता येतं पण पैशाचं सोंग करता येत नाही असं म्हणत अप्रत्यक्षपणे कर्जमाफी होणार असल्याचे अधोरेखित केले. अजित पवार म्हणाले की, पूरामुळे झालेलं नुकसान किती मोठं आहे याची जाणीव मला आहे. या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर ताबडतोब मदतकार्य सुरू करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. पिकांचे पंचनामे जलद गतीनं पूर्ण करून शेतकऱ्यांपर्यंत मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा तातडीनं उपलब्ध करून द्या, असे निर्देश देखील अजित पवारांनी दिले आहेत. दरम्यान, आज राज्य सरकारचे जे नियम आहेत, ते नियम बाजूला ठेवण्याची आमची तयारी आहे. शेतकऱ्यांची मदत करण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही काय करता येईल यात आम्ही कुठेही कमी पडणार नाहीत, असे सांगत अजित पवार यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची शक्यता फेटाळून लावली आहे.
सध्या ओला दुष्काळ मराठवाड्यात जाहीर करण्याती मागणी होत आहे. तसे झाल्यास कर्ज माफी द्यावी लागेल हे सरळ आहे. शिवाय निवडणुकीत कर्ज माफीची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळेच शेतकऱ्यांनी त्यांना प्रश्न विचारला होता. त्यामुळे अजित पवार विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत.