
काँग्रेस पक्षाचे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या गाडीचा सोमवारी पहाटे भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीत सुरु असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी प्रशांत पडोळे दिल्लीला निघाले असताना हा अपघात झाला.

दिल्लीला जाण्यासाठी नागपूर एअरपोर्टकडे निघालेल्या भंडारा – गोंदियाचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या वाहनाला एका ट्रकने जबर धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, प्रशांत पडोळे यांच्या कारच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. परंतु, सुदैवाने प्रशांत पडोळे या अपघातामधून थोडक्याच बचावले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, दिल्लीला जाण्यासाठी खासदार प्रशांत पडोळे हे सुरक्षारक्षक आणि चालकासह पहाटे नागपूर एअरपोर्टकडे निघाले होते. त्यावेळी नागपूर जिल्ह्यातील हल्दीरामसमोर ट्रकने त्यांच्या वाहनाला जबर धडक दिली. नशीब बलवत्तर या अपघातातून खासदार प्रशांत पडोळे थोडक्यात बचावले. मात्र, ते या अपघातात किरकोळ जखमी झाले. किरकोळ जखमी झाल्यानंतर खासदार प्रशांत पडोळे यांनी एका दुचाकीस्वराला लिफ्ट मागून नागपूर गाठलं आणि तिथं प्राथमिक उपचार घेतल्यानंतर नागपूर एअरपोर्टवर पोहोचून ते दिल्लीकडे रवाना झाले. यापूर्वीही खासदार प्रशांत पडोळे यांच्या वाहनाचा नागपूर इथं काही महिन्यांपूर्वी भीषण अपघात झाला होता. त्यातही ते किरकोळ जखमी झाले होते. खासदारांच्या वाहनाचा हात दुसरा अपघात आहे. हा अपघात नेमका कसा झाला, याचा तपशील अद्याप कळू शकलेला नाही.


