
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते समरजीत घाटगे यांनी पक्षाची साथ सोडली असून ते आज भाजपचे कमळ हाती घेणार आहेत.विधानसभा निवडणूकीत तिकिट न मिळाल्याने शेवटच्या क्षणी त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात पक्षप्रवेश करत विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, आता समरजीत घाडगे अवघ्या काही महिन्यातच भाजपमध्ये घरवापसी करणार आहेत.

समरजीत घाटगे आज मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित भाजपात पक्षप्रवेश करत आहेत. मात्र यामुळे पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार गटाला धक्का बसला आहे.

समरजीत घाटगे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपूर्वी सुरू होती. या चर्चांवर त्यांनी शिक्कामोर्तब केला होता. त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले होते की, ‘भाजपमध्ये बरेच दिवस माझा भाजपप्रवेश पेंडिंग होता. नगरपालिका आणि विशेषत: जिल्हा परिषद निवडणुकीत आमचे कार्यकर्ते भाजपच्या चिन्हावर निवडून आले आहेत.

त्यामुळे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून अधिवेशननंतर अधिकृत पक्षप्रवेश करण्यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली होती. त्यानुसार ८ तारखेला माझा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे,” हे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते.

