
“तुरुंगात जेवणात विष मिसळले जाण्याची शक्यता, राहुल गांधींनी मला अलर्ट केलंय”; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
जे लोक समाजासाठी लढतात, आंदोलन करतात अन् लोकांसाठी आवाज उठवतात, ते तुरुंगात असताना त्यांच्या जेवणात विष मिसळले जाण्याची शक्यता असते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ही शंका व्यक्त करत मला अलर्ट केले असून टॉक्सिक टेस्ट (Toxic Test) करण्याचा सल्ला दिला आहे,” असा अत्यंत खळबळजनक दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. कोल्हापूर दौऱ्यादरम्यान माध्यमांशी बोलताना आणि एका मुलाखतीत त्यांनी तुरुंगातील भयानक परिस्थिती आणि आपल्या आजारपणावर उघडपणे भाष्य केले.

राहुल गांधींनी काय सल्ला दिला?

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आपल्याला कॅन्सर झाल्याचा खुलासा संजय राऊत यांनी केला होता. त्यावर ‘तुरुंगात विषप्रयोग झाला का?’ असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता राऊत म्हणाले.दहा दिवसांपूर्वी मी राहुल गांधींना भेटलो होतो. त्यांनी स्वतः यावर शंका व्यक्त केली. तुमच्यासारख्या माणसाला अचानक असा आजार होणे अनाकलनीय आहे. तुरुंगात खाण्यापिण्यात गडबड केली जाऊ शकते. त्यामुळे तुम्ही तात्काळ ‘टॉक्सिक टेस्ट’ करून घ्या, असा सल्ला राहुल गांधींनी दिला आहे. मी ही टेस्ट करणार आहे. “सरकार क्रूर असते आणि तुरुंगात असताना ते काहीही करू शकते,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

“तुरुंगातील भयानक परिस्थितीमुळे कॅन्सरची सुरुवात”
आपल्या आजारपणाचे मूळ तुरुंगातील बिकट परिस्थितीत असल्याचे सांगताना संजय राऊत म्हणाले, “एका रूममध्ये १० ते २० लोक ठेवले जायचे. तिथे योग्य टॉयलेट किंवा आंघोळीची व्यवस्था नव्हती. जेवण नीट मिळत नव्हते. मला सात स्टेंट्स (Stents) बसवले आहेत, तरीही जिथे सूर्याची किरणे येत नाहीत अशा कोठडीत ठेवण्यात आले. या सगळ्यामुळेच मला कॅन्सरची सुरुवात झाली आणि बाहेर आल्यावर मी आजारी पडलो.”
‘त्या’ हायटेक कोठडीचा रंजक किस्सा
तुरुंगातील एका विशेष कोठडीचा उल्लेख करत राऊत म्हणाले, आम्ही ज्या कोठडीत होतो तिथल्या बाजूलाच एक अतिशय सुंदर, युरोपियन शैलीतील कोठडी होती. तिथे पाण्याचा शॉवर आणि साफसफाई होती. आम्ही विचारले की ही कोठडी कोणासाठी आहे? तर ती विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांच्यासाठी बनवण्यात आल्याचे सांगण्यात आले. ‘ते येईपर्यंत आम्हाला तिथे ठेवा’ अशी विनंती आम्ही केली, पण ब्रिटिश कोर्टाच्या नियमांमुळे ती रिकामीच ठेवली होती. आम्हाला मात्र हवा आणि पाणी नसलेल्या घाणेरड्या वातावरणात ठेवले गेले.विरोधी पक्षातील नेत्यांचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठीच प्रशासनाकडून असा प्रकार केला जात असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे.

