
बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज 9 एप्रिल शेवटचा दिवस असून, आतापर्यंत सहा जणांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. त्यानुसार 47 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.

काँग्रेसकडून आकाश मोरे यांना उमेदवारी मिळाली. काँग्रेस निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. राष्ट्रवादीकडून ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत दुसऱ्यांदा संवाद साधण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

अशातच आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मैदानात उतरले आहेत. त्यांनी मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली आहे. या भेटीत रोहित पवारांनी काँग्रेसने उमेदवारी मागे घ्यावी, अशी विनंती केली आहे.

रोहित पवारांनी एक्सवरुन ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा अखेरचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ साहेब यांची मुंबईत भेट घेतली आणि अजितदादा, त्यांचं काम आणि त्यांचा काँग्रेसशी असलेला संबंध बघता काँग्रेसने बारामतीत उमेदवारी मागे घ्यावी, अशी विनंती त्यांना केली, असे ट्वीटमध्ये रोहित पवार म्हणाले आहेत. आज दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. काँग्रेस निवडणूक लढण्यावर ठाम राहणार की दिल्लीतून नवा आदेश येणार नेमकं काय घडणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.

