
बारामतीच्या पोटनिवडणुकीत माझा रोल मतदानाला जाण्याचा आहे. शेवटी रिश्तेही मायने रखते है. सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला जाणार का? या प्रश्नावर उत्तर देताना हा प्रश्न त्यांनी विचारायला हवा असे सांगत अजित पवार गटाकडून बोलावणे आल्यास बारामतीत सुनेत्रा वहिनींचा प्रचार करण्याचे थेट संकेत सुप्रिया सुळे यांनी दिले आहे. तुम्ही हा प्रश्न अजित पवार गटाच्या वतीने विचारत असाल तर त्याचे उत्तर माझ्याकडे तयार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

तर बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध का झाली नाही याबाबतचे उत्तर तुम्ही अजित पवार गटालाच विचारा कारण यासाठीची सर्व मॅनेजमेंट तेच पाहत होते, असे सांगत बिनविरोध निवडणूक पूर्ण होण्यामागे अजित पवार गटाचे अपयश असल्याचे संकेतही त्यांनी दिले. काल दिवसभर मी बारामतीत नव्हते त्यामुळे नेमके काय घडले याची मला माहिती नाही पण निवडणूक काळात निवडणूक लढविण्यास कार्यकर्ते उत्सुक असतात असे सांगत सुप्रिया सुळे यांनी प्रश्नाला बगल दिली. पैसा सत्ता यापेक्षा कुटुंब महत्त्वाचे असते त्यामुळेच मी नेहमी सांगते, ‘रिश्ते मायने रखते है’ त्यामुळे संपूर्ण कुटुंब सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी असल्याचेही त्यांनी सांगितले. आज विठ्ठल दर्शनासाठी आले असता सुप्रिया सुळे माध्यमांशी बोलत होत्या.


