Latest Marathi News
Ganesh J GIF

मीरा-भाईंदरमध्ये ‘झोंबी ड्रग्स’चा शिरकाव?

गोरेगावातील त्या कॉन्सर्टच्या नावाखाली रेव्ह पार्टी झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तरुणांकडून अपलोड करण्यात आलेल्या व्हिडिओत रेव्ह पार्टीचा उल्लेख असल्याचं समोर आलं आहे. या पार्टीत ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर एक गंभीर अवस्थेत असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा टेन्शन वाढवणारी बातमी आहे. मुंबईला लागून असलेल्या मीरा-भाईंदर परिसरातून एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरात चक्क झोंबी ड्रग्स पोहोचल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एका तरुणाचा रस्त्यावर विचित्र वागण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, या तरुणाने झोंबी ड्रग्स घेतल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण रात्रीच्या वेळी भररस्त्यात अर्धनग्न अवस्थेत दिसत आहे. त्या तरुणाचा स्वत:च्या शरीरावरचा ताबा राहिलेला नाही. एकाच अवस्थेत बराच वेळ तो उभा राहिलेला दिसत आहे. अतिशय अनियंत्रित आणि विचित्र हालचाली करत असल्याचं स्थानिकांच्या निदर्शनास आलं. प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार, तो तरुण एखाद्या झोंबीप्रमाणे वागत होता. त्याच्या या भयानक अवस्थेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

जगभरात झोंबी ड्रग्स म्हणून ओळखले जाणारे झायलझीन किंवा तत्सम घातक अमली पदार्थ माणसाची शुद्ध हरपवून त्याला जिवंत प्रेतासारखे वागायला लावतात. शरीरातील स्नायूंवरचा ताबा सुटतो आणि व्यक्ती विचित्र हालचाली करू लागते. राज्याबाहेर सक्रिय असलेले हे अमली पदार्थांचे जाळे आता मुंबईच्या वेशीवर पोहोचल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मीरा-भाईंदर पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. तो तरुण नक्की कोण होता आणि त्याने कोणत्या प्रकारचे अमली पदार्थ सेवन केले होते, याचा सखोल तपास सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा अफवांवर पूर्णपणे विश्वास न ठेवता कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!