
बहुचर्चित महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरुन सरकारचा संसदेत पराभव झाल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज रात्री 8.30 वाजता देशवासियांना संबोधित करणार आहेत. महिला आरक्षण विधेयक , तसेच मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर ते मत मांडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेसाठीचं 131 वं घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत एकमतानं नामंजूर झालं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. विरोधी पक्षांना महिला आरक्षण विधेयक रोखल्याची किंमत मोजावी लागणार, असं मोठं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्याची माहिती आहे.

महिला आरक्षण विधेयक रोखून विरोधकांनी खूप मोठी चूक केली. विरोधकांनी आमचा पराभव केला नाही तर महिलांच्या हक्कांचा विरोध केला. विरोधकांची महिलांप्रती विचारसरणी ही नकारात्मक आहे. हा संदेश देशातील प्रत्येक गावात पोहोचवला पाहिजे, असं नरेंद्र मोदी म्हणाले. विरोधी पक्ष आता आपली भूमिका योग्य ठरवण्याचा आणि लपवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा शब्दात मोदींनी टीका केल्याची माहिती आहे.

नेमक्या याच मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशवासियांना रात्री 8.30 वाजता संबोधित करणार आहेत. आता पंतप्रधान नेमकं काय बोलणार, ते काय भूमिका मांडणार, तसेच विरोधी पक्षांवर ते काय टीका करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

