Latest Marathi News
Ganesh J GIF

भोंदू बाबाला महावितरणचा ‘हाय-व्होल्टेज’ शॉक!; दत्तधाम आश्रमात मीटर बायपास करून वीजचोरी

संगमनेरच्या वडगावपानमध्ये स्वतःला ‘दत्तधाम सरकार’ म्हणवून घेणाऱ्या राजेंद्र गडगेचा आणखी एक काळा कारनामा उघड झाला आहे. जादूटोणा आणि लोकांच्या फसवणूक प्रकरणी आधीच कोठडीत असलेल्या या भोंदूला आता महावितरणने जोरदार ‘शॉक’ दिला आहे. भक्तांना मंत्र-तंत्र शिकवणाऱ्या या बाबाचा वीजचोरीचा ‘चमत्कार’ आता समोर आला असून, त्याला लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

कॅन्सर बरा करण्याचा दावा करणारा आणि निसंतान महिलांची फसवणूक करणारा संगमनेरचा तो कथित ‘दत्तधाम सरकार’ म्हणजेच राजेंद्र गडगे! सध्या पोलिसांच्या कोठडीत चक्की पिसत असलेल्या या भोंदू बाबाच्या अडचणीत आता मोठी भर पडली आहे.

वडगावपान येथील ‘दत्तधाम’ आश्रमात भक्तांची लूट करून गडगेने आरामाची सर्व साधनं जमवली होती. एअर कंडिशनर्सपासून ते पाण्यासाठी मोठ्या बोअरवेलपर्यंत सर्व काही तिथे होतं. मात्र, या चकाचौंधीमागे एक काळा धंदा लपला होता. स्वतःच्या आश्रमाचे वीज बिल वाचवण्यासाठी या ‘महाराजांनी’ चक्क मुख्य मीटरच बायपास करून वीज चोरी सुरू केली होती.

महावितरणच्या पथकाने जेव्हा आश्रमाची झडती घेतली, तेव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आला. “मंत्रशक्तीने लोकांचे प्रश्न सुटतात” असा दावा करून लोकांना १५ ते ५१ हजार रुपयांना लुटणारा हा भोंदू, स्वतःच्या आश्रमाचं बिल भरण्यासाठी मात्र चोऱ्या करत असल्याचं आता सिद्ध झालं आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पाठपुराव्यामुळे संगमनेर पोलिसांनी याआधीच गडगे आणि त्याच्या साथीदारांवर जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. आता महावितरणनेही २ लाखांचा दंड ठोठावून कडक कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!