Latest Marathi News
Ganesh J GIF

मुनगंटीवार बोलायला उठले अन् धानोरकरांनी स्टेज सोडलं!

चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘हिराई महोत्सवा’च्या उद्घाटन सोहळ्यात राजशिष्टाचाराच्या मुद्द्यावरून मोठे नाराजीनाट्य पाहायला मिळाले.

शासकीय कार्यक्रमात नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी थेट मंचावरूनच जिल्हा प्रशासन आणि मनपावर ताशेरे ओढले आणि कार्यक्रमातून ‘वॉक आऊट’ केले. याप्रकरणी आता त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे धाव घेत विशेषाधिकार भंगाची मागणी केली आहे.

चंद्रपूरच्या हिराई महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या उपस्थितीत पार पडले. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी, आमदार सुधीर मुनगंटीवार आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. मात्र, हा कार्यक्रम शासकीय असतानाही मंचावर भाजप कार्यकर्त्यांचे सत्कार सोहळे सुरू असल्याने खासदार धानोरकर यांनी तीव्र आक्षेप घेतला.

खरा वाद तेव्हा रंगला जेव्हा खासदार प्रतिभा धानोरकर यांचे भाषण संपल्यानंतर आमदार सुधीर मुनगंटीवार भाषणासाठी उभे राहिले. राजशिष्टाचारानुसार, खासदारांच्या भाषणानंतर केवळ कॅबिनेट मंत्रीच भाषण करू शकतात, असे सांगत धानोरकर यांनी प्रशासनाला खडे बोल सुनावले. आमदारांना खासदारांच्या नंतर बोलू देणे हा प्रोटोकॉलचा भंग असल्याचे त्यांचे म्हणणे होते. संतापलेल्या खासदारांनी मुनगंटीवार भाषणाला उभे राहताच कार्यक्रमातून बाहेर पडणे पसंत केले.

हे प्रकरण केवळ व्यासपीठापुरते मर्यादित राहिले नाही. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी काल रात्री उशिरा लोकसभा अध्यक्षांना पत्र पाठवून या घटनेची अधिकृत तक्रार केली आहे. “चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने एका महिला खासदाराचा जाणीवपूर्वक अपमान केला आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी पत्रात केला आहे. तसेच हे प्रकरण संसदेच्या विशेषाधिकार समितीकडे सोपवावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. आता यावर भाजपचे नेते काय बोलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!