Latest Marathi News
Ganesh J GIF

पोटदुखी ठरली निमित्त, समोर आलं काळजाचा थरकाप उडवणारं सत्य; गोव्यातील अल्पवयीन मुलीसोबत धक्कादायक प्रकार

उत्तर प्रदेशातील मथुरेजवळील राया परिसरात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलगी ही मूळची राया परिसरातील असून तिचे कुटुंब गेल्या दहा वर्षांपासून नोकरीनिमित्त गोव्यात वास्तव्यास आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात पीडिता आपल्या आईसोबत आजोबांच्या देखभालीसाठी गावी आली होती. यादरम्यान तिची ओळख गावातील गोलू नावाच्या तरुणाशी झाली. डिसेंबर महिन्यात घरात कोणीही नसताना संशयित आरोपीने या 13 वर्षीय मुलीवर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

काही दिवसांनंतर पीडित मुलगी पुन्हा गोव्याला निघून गेली. मात्र, 29 मार्च रोजी अचानक तिच्या पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या. कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी तातडीने डॉक्टरांकडे नेले असता, वैद्यकीय तपासणीत ती 14 आठवड्यांची गरोदर असल्याचे समोर आले. या अनपेक्षित माहितीमुळे मुलीच्या पालकांना मोठा धक्का बसला. त्यानंतर पालकांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, पीडितेने गावातील तरुणाने केलेल्या अत्याचाराची सर्व माहिती आपल्या कुटुंबीयांना दिली.

घटनेचे गांभीर्य ओळखून डॉक्टरांनी कायदेशीर बाबींमुळे गर्भपातास नकार दिला आणि गोवा पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. गोव्यातील मडगाव टाऊन पोलिसांनी उपनिरीक्षक अनुष्का यांच्या नेतृत्वाखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. प्राथमिक चौकशीनंतर ही घटना उत्तर प्रदेशातील राया पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या हा गुन्हा शून्य क्रमांकाने नोंदवून पुढील तपासासाठी राया पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!