
बहिणीची आर्त हाक! “दादा, तुझा तो फोन शेवटचा ठरेल असं वाटलं नव्हतं”; सुप्रिया सुळेंची फेसबुक पोस्ट व्हायरल
बारामतीमध्ये दिवंगत नेते अजित पवारांच्या निधनानंतर पोटनिवडणूक होत आहे.या निवडणुकीला दुःखाची किनार आहे. घरातील व्यक्तीचे निधन झाल्यामुळे शरद पवार गटाने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सुनेत्रा पवारांसाठी शरद पवार गट प्रचार देखील करत आहे. आमदार रोहित पवार हे स्वतः गाठीभेटी घेत असून हा प्रचार महायुतीसाठी नाही तर सुनेत्रा काकींसाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. याचबरोबर यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बारामती पोटनिवडणूक आणि अजित पवारांबाबत आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या की, “दादांची एनर्जी तुम्ही पाहिलेली आहे. आजही अंगावर काटा येते. सकाळी 8.30 वाजता विमान पडल्याचा तो फोन आलेला. तो दिवस आणि आजचा दिवस असं वाटतं, दादा खरच गेलाय का? कधी कधी असं वाटतं की दादा खरच गेलाय का, अशी भावना मनात येते. शेवटची ती भेट, एक फोन या गोष्टी मनात राहिल्या. विमान पडलं कसं? एका सेकंदात सगळं संपलं” अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी कडू आठवण सांगितली.

पुढे त्या म्हणाल्या की, “बारामतीत बाबा सगळं इलेक्शन संपवून यायचे. प्रचाराची शेवटची सभा घ्यायचे. दादाने तीच परंपरा कायम ठेवली. दादा आणि साहेब फॉर्म भरणार आणि शेवटच्या सभेला येणार. बारामती लोकसभा मतदारसंघात आम्ही कुटुंब म्हणून काम करतो. कौटुंबिक विश्वासाची नाती आहेत. काही कमी-जास्त झालं असेल, म्हणून आमच्या मनात, नात्यात कधी अंतर आलेलं नाही. इथून पुढे कधी येऊ देणारही नाही. दादा गेल्यानंतरची सभा आहे. मला अंतकरणातून खूप दु:ख आहे. जड अंतकरणाने मी बारामतीला जात आहे. माझा भाऊ गेल्यानंतरची ही परिस्थिती आहे. दु:ख आहे,” अशा शब्दांत खासदार सुळे यांनी भावना व्यक्त केल्या.


