Latest Marathi News
Ganesh J GIF

पिस्तुलसह गुन्हेगार जेरबंद!; दौंड पोलिसांची मोठी कारवाई

दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. दौंड तालुक्यातील खडकी येथील शिवाजी महाराज चौक परिसरात बुधवारी (दि. २२ एप्रिल) ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव संजय शिंदे (वय – रा. खडकी, ता. दौंड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी
एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि तीन जिवंत काडतुसे असा एकूण ५३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

बुधवारी दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत एक महत्त्वाची माहिती मिळाली. खडकी येथील शिवाजी महाराज चौकात वैभव शिंदे हा तरुण संशयास्पद रित्या वावरत असून त्याच्याकडे बेकायदेशीर शस्त्र असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीची खातरजमा करून, पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दौंड गुन्हे शोध पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. संशयित आरोपी वैभव शिंदे याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या कमरेला देशी बनावटीचे पिस्तुल आणि जिवंत काडतुसे मिळून आली.

पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्यावर भारतीय शस्त्र कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक चौकशीत त्याने हे शस्त्र अवैधरित्या खरेदी केल्याची कबुली दिली आहे. मात्र, हे शस्त्र त्याने नक्की कोणाकडून विकत घेतले? आणि हे शस्त्र बाळगण्यामागे त्याचा नक्की काय उद्देश होता? याचा सखोल तपास आता दौंड पोलीस करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!