Latest Marathi News
Ganesh J GIF

गोविंद पानसरेंवर मरणोत्तर गुन्हा दाखल करा!; संजय गायकवाडांच्या नावाने ‘ती’ पोस्ट व्हायरल

शिवसेनेचे (शिंदे गट) आक्रमक नेते आणि आमदार संजय गायकवाड सध्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. ‘शिवाजी कोण होता?’ या प्रसिद्ध पुस्तकाच्या प्रकाशकाला कथित धमकी आणि शिवीगाळ केल्याचे प्रकरण ताजे असतानाच, आता त्यांच्या नावाने एक खळबळजनक पत्रक व्हायरल होत आहे. या पत्रकात दिवंगत कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर मरणोत्तर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

गेल्या २४ तासांपासून सोशल मीडियावर एक पत्रक व्हायरल होत आहे, ज्यावर आमदार संजय गायकवाड यांचे नाव आहे. या पत्रकात ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावर बंदी घालण्याची आणि लेखक गोविंद पानसरे यांच्यावर मरणोत्तर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. मात्र, आमदार संजय गायकवाड यांनी अशा कोणत्याही मागणीचा इन्कार केला आहे.

संजय गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, “व्हायरल होत असलेल्या त्या पत्रकाशी माझा कोणताही संबंध नाही. त्यावर माझी सही नाही किंवा माझ्या कोणत्याही अधिकृत पदाधिकाऱ्याची स्वाक्षरी नाही. हे पत्रक कुणीतरी खोडसाळपणे व्हायरल केले आहे.”

व्हायरल पत्रकातील १० धक्कादायक मागण्या:

व्हायरल होत असलेल्या या बनावट पत्रात अत्यंत गंभीर मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत:
१. एकेरी उल्लेख: पुस्तकाच्या शीर्षकात छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘शिवाजी’ असा एकेरी उल्लेख करून अपमान केल्याचा दावा.
२. RNI मंजुरी: पुस्तकाला भारत सरकारच्या प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया (RNI) ची अधिकृत मंजुरी आहे का, याची चौकशी.
३. पुस्तकावर बंदी: योग्य सर्टिफिकेट नसल्यास पुस्तकाच्या विक्रीवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी.
४. मरणोत्तर गुन्हा: नियमांचे उल्लंघन झाले असल्यास लेखकावर मरणोत्तर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी.
५. मुद्रकावर कारवाई: जिल्हाधिकाऱ्यांचे डिक्लेरेशन नसल्यास प्रिंटरला अटक करून मशीन जप्त करण्याची मागणी.
६. प्रशांत आंबी यांच्यावर कारवाई: प्रकाशक प्रशांत आंबी यांच्यावर अटकेची कारवाई करण्याची मागणी.
७. संपत्ती जप्त करा: पुस्तकाच्या विक्रीतून मिळालेली संपत्ती राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करण्याची मागणी.
८. डीटीपी ऑपरेटरला अटक: पुस्तक छापणाऱ्या आणि प्लेट्स बनवणाऱ्यांवरही कारवाईचा उल्लेख.
९. फंडिंगची चौकशी: या पुस्तकासाठी चीन, पाकिस्तान किंवा कोणत्याही ‘जिहादी’ शक्तींकडून फंडिंग मिळाले आहे का, याची सीआयडी (CID) चौकशी करण्याची मागणी.
१०. मालमत्ता जप्ती: कोल्हापुरातील संबंधित मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देण्याची विनंती.

गायकवाडांची भूमिका काय?

या सर्व वादावर पडदा टाकताना संजय गायकवाड यांनी स्पष्ट केले की, त्यांनी प्रकाशकाला फोन केला होता ही वस्तुस्थिती असली, तरी मरणोत्तर गुन्हा दाखल करण्याबाबतचे पत्रक त्यांनी प्रसिद्ध केलेले नाही.

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!