
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सोमवारी दुपारी न्या. इचपुराणी यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी अभियोक्ता शैलेंद्र बागडे यांनी सहा दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती.

खरातने स्वत: कडे दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा करून, मंत्र-तंत्र व धार्मिक विधीच्या नावाखाली फिर्यादीला पाण्यामध्ये गुंगीकारक पदार्थ देऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच ही बाब कोणाला सांगितल्यास दैवी शक्तीने तिच्या मुलांना ठार मारण्याची व तिचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली, अशा स्वरूपाचा गंभीर आरोप या गुन्ह्याप्रकरणी खरातवर आहे.

एसआयटीचे तपास अधिकारी भारती यांनी खरातवर वरीलप्रमाणे गंभीर आरोप असून, प्राथमिक चौकशी फक्त पूर्ण झाली आहे. अनेक धागेदोरे तपासायचे असल्याने सहा दिवसांची पोलीस कोठडी मागितली. सरकारी अभियोक्ता शैलेंद्र बागडे यांनी युक्तिवाद केला की, खरातने या गुन्ह्याची कबुली दिली असली, तरी त्याला या गुन्ह्यात कोण साथ देत होतं, गुंगीकारक पदार्थात कोणते औषध मिसळले वैगेरे तपास बाकी असल्याने सहा दिवसांची पोलीस कोठडीची गरज विषद केली.

तर खरातच्या वकिलांनी मात्र पोलीस कोठडीला जोरदार विरोध करत प्रत्येक गुन्ह्याच्या सुनावणीत सरकारी वकील तसेच तपास आधिकारी तेच ते मुद्दे मांडून पोलीस कोठडी मागत असल्याचे सांगून न्यायालयीन कोठडीची मागणी केली. मात्र न्या. इचपुरानी यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
तसेच त्याच्या कार्यालयात एका महिलेच्या नावाने असलेला मोठ्या रकमेचा धनादेश देखील सापडला असून, ही महिला कोण आहे, तिचे खरातसोबत कनेक्शन हे गूढ मात्र कायम आहे. खरात भक्त तसेच पीडितांकडून पैसे उकळत असल्याचा संशय देखील यामुळे बळावला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास बाकी असल्याने खरातला सहा दिवसांची पोलीस कोठडी सरकारी अभियोक्त्यांनी मागितली.

