
भरदिवसा वाईत थरार: वहिणीचा ओरडण्याचा आवाज अन्… दिराचं क्रूर कृत्य पाहून प्रत्यक्षदर्शींच्या काळजाचा चुकला ठोका.
जमीन विक्रीच्या कारणातून दीराने भावजयीवर धारदार शस्त्राने हल्ला करून तिचा निर्घृण खून केला. ही धक्कादायक घटना वाई तालुक्यातील बालेवाडी येथे मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली.या घटनेनंतर वाई पोलिसांनी दिराला तातडीने ताब्यात घेऊन अटक केली.

भिकू विठ्ठल यादव (५५) असे पोलिसांनी अटक केलेल्या दिराचे तर गीताबाई चंद्रकांत यादव (४५) असे मृत भावजयीचे नाव आहे. वडिलोपार्जित शेतजमिनीच्या विक्रीवरून यादव कुटुंबात मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. भिकू यादव हा वारंवार जमीन विकण्यासाठी दबाव टाकत होता. मात्र भाऊ व भावजयीने जमीन विकण्यास नकार दिला होता. यावरून शिकू यादव चिडून होता.

दरम्यान मंगळवारी २८ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास भीकू यादव याने भावजयीवर धारदार शस्त्राने हल्ला केला. भावजयीचा ओरडण्याचा आवाज आल्याने उपस्थितांनी घरात घाव घेतली. त्यावेळी भिकू यादव हा धारदार शस्त्राने भावजयीवर वार करत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पाहिले. उपस्थितांना पाहताच त्याने घटनास्थळावरून पलायन केले.या घटनेनंतर गीताबाई यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पती चंद्रकांत विठ्ठल यादव यांत्री वाई पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, वाई पोलिस पुढील तपास करत आहेत.


