
यवत परिसरात झालेल्या एका मोठ्या चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला अवघ्या ४८ तासांत यश आले आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून, त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दौंड तालुक्यातील यवत परिसरात झालेल्या चोरीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी गस्त घालत असताना अत्यंत चपळाईने या प्रकरणाचा तपास केला.

खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी राहू ते यवत रस्त्यावर सापळा रचून सुनील बजरंग काळे या २२ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले.पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. तपासात समोर आलेली माहिती थक्क करणारी आहे.

आरोपीने चोरीच्या २ लाख ५० हजार रुपयांपैकी १ लाख ३० हजार रुपये आपल्या भावाच्या बँक खात्यावर ट्रान्सफर केले होते. जवळपास ६० हजार रुपये रोख आणि सोन्याचे दागिने त्याने घरात लपवून ठेवले होते. विशेष म्हणजे, चोरीची उर्वरित रक्कम आरोपीने ऑनलाइन गेमिंगमध्ये उडवल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील कारवाईसाठी यवत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ४८ तासांत गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

