Latest Marathi News
Ganesh J GIF

‘लाडकी बहीण’ योजनेच्या KYC च्या नावाखाली महिलांसोबत घडला घृणास्पद प्रकार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या बहाण्याने महिलांची फसवणूक करण्याचे प्रकार थांबण्याचं नाव घेत नाहीत. आता कल्याणच्या मोहने परिसरातून एक धक्कादायक सायबर फसवणुकीची घटना समोर आली आहे. एका खाजगी एजंटने महिलेची केवळ फसवणूकच केली नाही, तर तिच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे.

नेमकी घटना काय?

संबंधित पीडित महिलेला योजनेचे हप्ते मिळत नव्हते. केवायसी न झाल्यामुळे तांत्रिक अडचण येत असल्याचे समजताच, तिने परिसरातील लोकांच्या सांगण्यावरून ऋतिक खंडारे नावाच्या एका खाजगी एजंटशी संपर्क साधला. आरोपी ऋतिकने केवायसी करून देण्याच्या बहाण्याने महिलेकडून कागदपत्रे आणि एक हजार रुपये घेतले.

मोबाईलचा केला गैरवापर

केवायसी प्रक्रियेसाठी ओटीपी लागेल, असे सांगून आरोपीने महिलेचा मोबाईल काही वेळ स्वतःकडे घेतला होता. मात्र, काही दिवस उलटूनही केवायसी पूर्ण झाली नाही आणि पैसेही आले नाहीत. दरम्यान, एका व्यक्तीने संबंधित महिलेकडे येऊन तिच्या नावाने अश्लील मेसेज येत असल्याची तक्रार केली, तेव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आला.

बनावट इन्स्टाग्राम अकाउंटचा ‘अश्लील’ प्रताप

पीडित महिलेला इन्स्टाग्रामबद्दल काहीही माहिती नव्हती. मात्र, तिच्या मुलीने तपास केला असता, आरोपी ऋतिक खंडारे याने त्या दिवशी महिलेचा मोबाईल वापरून तिच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार केल्याचे निष्पन्न झाले. याच अकाउंटवरून तो इतर लोकांना अश्लील संदेश आणि व्हिडिओ पाठवत होता.

पोलीस कारवाई आणि आवाहन

या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी ऋतिक खंडारे याला नोटीस देऊन तपास सुरू केला आहे.

नागरिकांना आवाहन

योजनेच्या कामासाठी कोणत्याही खाजगी व्यक्तीला आपला मोबाईल किंवा ओटीपी देऊ नका.अनोळखी एजंटला कागदपत्रे आणि पैसे देणे टाळा.काहीही शंका आल्यास अधिकृत शासकीय केंद्रावर किंवा सेतू केंद्रावर जाऊनच खात्री करा. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सायबर गुन्हेगारांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!