Latest Marathi News
Ganesh J GIF

“काळजाला पीळ पाडणारी घटना! भरधाव आयशरने चिरडले, दाम्पत्याचा मृत्यू; चिमुकल्या बाळासमोरच आई-वडिलांनी सोडले प्राण.”

जळगाव, प्रतिनिधी इम्तियाज अहमद: एकीकडे सुखी संसाराची स्वप्नं रंगवत असतानाच घात झाला. दोघंही खूप आनंदात एकमेकांशी बोलत चालले होते. अचानक असं काही घडलं काळानं सगळंच हिरावून घेतलं आणि मूल पोरकं झालं.आई वडिलांचं छत्र हरपलं. मुक्ताईनगर तालुक्यातील पिंपरी नांदू ते बेलसवाडी चौफुलीवर झालेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण जिल्हा हळहळला. एका भरधाव आयशर ट्रकने मोटरसायकलला दिलेल्या जोरदार धडकेत पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातात अवघ्या एक वर्षाचा चिमुरडा सुदैवाने वाचला असला, तरी त्याच्या डोक्यावरचं आई-वडिलांचं छत्र कायमचं हरपलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे दांपत्य आपल्या लहान बाळासह मोटरसायकलने प्रवास करत असताना बेलसवाडी चौफुलीवर काळ बनून आलेल्या आयशरने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, पती आणि पत्नी दोघांचाही जागीच मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आई-वडिलांच्या जवळ पडलेलं ते १ वर्षाचं बाळ जखमी अवस्थेत रडत होतं, हे पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आलं.

अपघाताची भीषणता पाहून परिसरातील नागरिकांचा संयम सुटला. संतप्त झालेल्या जमावाने अपघातग्रस्त आयशर ट्रकवर दगडफेक करत त्याच्या काचा फोडल्या. काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. अपघातात जखमी झालेल्या त्या निष्पाप चिमुरड्याला तातडीने रावेर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. संपूर्ण मुक्ताईनगर परिसरात या घटनेमुळे शोककळा पसरली असून, वेगाने चालणाऱ्या जड वाहनांविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!