
पुण्यातील चंदन नगर परिसरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथं एका २२ वर्षीय तरुणीवर जीवघेणा हल्ला झाला आहे. लग्नास नकार दिल्याचा राग मनात धरून प्रियकराने तरुणीच्या घरात घुसून तिच्या गळ्यावर चाकूने वार केले.ही घटना आठ दिवसांपूर्वी घडली आहे. या घटनेबाबतची माहिती आता उपलब्ध झाली आहे. गेल्या आठ दिवसांपासून ही तरुणी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असून तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

नेमकी घटना काय?
चंदननगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार २९ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडला. आरोपी दिलीप राठोड आणि पीडित तरुणी हे दोघे पुण्यातील एका नामांकित मॉलमध्ये एकत्र कामाला होते. कामाच्या ठिकाणीच दोघांची ओळख झाली आणि त्याचं रूपांतर मैत्री आणि पुढे प्रेमात झालं होतं.

लग्नावरून झाला वाद
काही दिवसांपूर्वी पीडित तरुणी तिच्या मूळ गावी गेली होती. तिथे तिच्या कुटुंबीयांनी तिचं लग्न दुसऱ्या एका तरुणाशी ठरवलं. गावाहून परतल्यानंतर तिने ही बाब आरोपी दिलीपला सांगितली. “माझ्या घरातील लोकांनी माझं लग्न ठरवलं आहे, त्यामुळे आपण आता पुढे नको जायला,” असं तिने आरोपीला स्पष्ट केलं. मात्र, दिलीपला हे मान्य नव्हतं. त्याने लग्नासाठी तगादा लावला होता.

घरात घुसून खुनी हल्ला
२९ एप्रिल रोजी रात्री दिलीप संतापलेल्या अवस्थेत तरुणीच्या घरी पोहोचला. तिथे दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. आरोपीनं तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि रागाच्या भरात आपल्याजवळील चाकूने तिच्या गळ्यावर सपासप वार केले. या हल्ल्यानंतर तरुणी रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र आठवडा उलटूनही तिची प्रकृती सुधारलेली नाही.
आरोपी पोलिसांच्या ताब्यात
या घटनेनंतर चंदन नगर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत मुख्य आरोपी दिलीप राठोड याला अटक केली आहे. दिवसाढवळ्या आणि घरात शिरून झालेल्या या हल्ल्यामुळे चंदन नगर परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.

